पुणे / 16 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील रिसॉर्टवर एक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. मात्र पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बॅक वॉटरमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मुलीला उपस्थितांनी तात्काळ पाण्याबाहेर काढले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वडिलांचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहिम राबवूनही मृतदेह सापडला नव्हता. रात्री अंधार झाल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली होती. मात्र सकाळी वडिलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. शिरीष मनोहर धर्माधिकारी आणि ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी अशी बुडालेल्या बापलेकीची नावं आहेत.
मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्याने औंध येथील शिरीष धर्माधिकारी कुटुंबासह भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असणाऱ्या रिसॉर्टवर पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे अन्य काही नातेवाईकही होते. हे सर्वजण दुपारी 4 च्या सुमारास सिमा फार्म रिसॉर्टच्या पाठीमागे असणाऱ्या भाटघर धरणाचे पाणी पाहण्यासाठी गेले. यावेळी शिरीष हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर मुलगी ऐश्वर्या हिला देखील त्यांनी बोलावून घेतले.
दरम्यान, दोघेही खोल पाण्यात पोहत असताना अचानक बुडाले. यावेळी उपस्थित काहींनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले तेव्हा ती बेशुध्द पडलेली होती. त्यानंतर तिला सरकारी दवाखाना भोर येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तर शिरीष धर्माधिकारी हे पाण्यात बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. मात्र रात्री अंधार पडल्यानं हे शोधकार्य थांबविण्यात आलं. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगातना आढळून आला आहे. घटनेचा अधिक तपास भोर पोलीस करत आहेत.