बिरदवडी, खेड : शालेय पोषण आहारातील (Shaley poshan aahar) धान्य विक्रीसाठी नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यात उघड झाला आहे. बिरदवडी येथील बाबुराव पवार विद्यालयात शालेय पोषण आहारातील तूरडाळ आणि तांदुळ यांची सुमारे 30 हजार रुपयांची 15 पोती धान्य (Grain) विक्रीसाठी नेली जात असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी विद्यालय संस्थेच्या अध्यक्षा देवयानी पवार, प्रभारी मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण, ईशान पवार, अनिल चौगुले यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात (Chakan police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चाकणपासून जवळच असणाऱ्या बिरदवडी गावातील बाबुराव पवार महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करणाऱ्या शाळा मुख्याध्यापक तसेच संस्थेच्या अध्यक्ष यांचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे.
प्रभारी मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण आणि संस्थेच्या अध्यक्षा देवयानी पवार यांनी शालेय मुलांचा पोषण आहार एका केटरिंग व्यवसायिकाला विक्री केला जात होता. यावेळी पुष्पा म्हसे नामक एका बहादूर शिक्षिकेच्या चातुर्यपणामुळे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या अध्यक्षा यांचा या काळ्या कारभारचा प्रताप उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा दामोदर म्हसे (वय 40) पेशाने शिक्षिका आहेत. सध्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या पुष्पा म्हस्के या त्यांच्या मालकीचे दवणे वस्ती येथील वर्क शॉप येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या वर्कशॉपवरील काम उरकून सायंकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास पुन्हा त्यांच्या घरी जात असताना जवळच असलेल्या बिरदवडी येथील बाबुराव पवार महाविद्यालयात एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन शाळेच्या पोषण आहार साठवणूक खोलीजवळ उभी असल्याचे शिक्षिका पुष्पा म्हसे यांना दिसले.
या वाहनावर त्यांना शंका आली. त्यामुळे त्या संबंधित वाहनाजवळ गेल्या असता त्या ठिकाणी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण आणि संस्थेच्या अध्यक्षा तसेच स्वतः प्राध्यापिका असलेल्या देवयानी पवार त्या ठिकाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याचवेळी एक वाळुंज नामक केटरिंगवाला व्यक्तीही त्यांच्याबरोबर असल्याचे म्हसे यांच्या निदर्शनास आले. यावर या कार्यतत्परता दाखवणाऱ्या शिक्षिकेने त्यांच्याकडे चौकशी केली असता केटरिंगवाला वाळुंज व त्यांच्या सोबत असलेल्या ड्रायव्हर हे दोघे मिळून घाईघाईने शाळेतील शालेय पोषण आहार रूममधून धान्याचे पोते वाहनांमध्ये भरत असल्याचे दिसून आले.
संबंधित शिक्षिकेने उपस्थित प्रभारी मुख्याध्यापक व संस्थेची मुजोर अध्यक्षा यांना हा काय प्रकार आहे, हे विचारले असता, अध्यक्षा देवयानी पवार व मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण यांनी या शिक्षिकेस ओरडून सांगितले, की तुझे या शाळेत काय काम आहे? आम्ही धान्य विकू अथवा काही करू असे म्हणून या दोघांनी शिवीगाळ करण्यात आली. गाडी चालकाने त्या शिक्षिकेला ढकलून पळून जाण्याचाही धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून देवयानी पवार यांना अटक करण्यात आली आहे तर मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण फरार आहेत.