पुणे : पुण्यातल्या भोर तालुक्यातील महुडे गावातील घराला अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सोपान बदक या शेतकऱ्याचे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्यात बांधलेल्या जनावरांना (Cattle) वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. मात्र आगीत जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक झाल. आग कशामुळे लागली होती, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान बदक यांच्या घरातून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामकाची (Firebrigade) गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गावकरी आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणली.
भोर तालुक्यातील महुडे या गावात सोपान बदक यांच्या घरातील ही आग अतिशय भीषण स्वरुपाची होती. यात मोठ्या प्रमाणावर घरातील वस्तू तसेच शेतीउपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे. यात घरातील अन्न धान्य, कपडे, जनावरांचा चारा, 28 हजारांची रोख रक्कम यासह अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तर जवळपास यामुळे सुमारे 5 लाखांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. घराचे छतही यामुळे उडाले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमधून या आगीची दाहकता दिसून येते.
शेतीच्या संकटांना आधीच शेतकरी हैराण झाला आहे. महागाई वाढल्यामुळे सर्वच शेतीसंबंधीच्या बाबी महाग झाल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात पैसा जात आहे. त्यात अशाप्रकारच्या संकटांमुळे अधिकच भर पडत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आगीमुळे संबंधित शेतकरी हवालदिल झाला आहे. घर पूर्ण जळून खाक झाले आहे. अचानक आग लागल्यामुळे गावकऱ्यांचीही मोठी धावपळ झाली. त्यांनी आग विझवण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. मात्र आग मोठी होती. लगेचच अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर काही वेळात अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.