पुणे : पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज (Katraj) नवीन बोगद्याच्या (Tunnel) आसपासच्या परिसरातील डोंगरांवर भीषण वणवा (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यात आसपासचे संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक झाले आहेत. वणव्यामुळे डोंगरांवर रोषणाई केल्यासारखे दृश्य दिसत होते. वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे डोंगरावर असणाऱ्या करवंद, बोरं, आंबा याबरोबरच इतर जंगली वनस्पती आणि फळे वाया जात आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान यामुळे झाले आहे. त्याचबरोबर सरपटणारे प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. वणव्यांपासून वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून आणि पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याने अशावेळी तो विझवणेही अवघड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ याआधीही वणव्याच्या घटना घडल्या आहेत. एकदा तर अभिनेता सयाजी शिंदे यांनी अग्निशामक दलाला कॉल करून आग लागल्याची माहिती दिली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. तर आणखी एका घटनेत रस्त्याच्या कडेला कुणीतरी टायर पेटवून दिल्याने सर्वत्र वणवा पेटला होता. वाळलेल्या गवतामुळे सर्वत्र आग पसरली होती.