पुणे : खाद्यतेलाचा (Edible oil) पुनर्वापर करणाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) इशारा दिला आहे. खाद्यतेलाचा पुनर्वापर शरीरास अत्यंत घातक (Dangerous) असून अन्न सुरक्षेच्या नियमांच्या विरुद्ध आहे. खाद्यतेलाचा वापर तळण्यासाठी शक्यतो एकदाच करावा. त्याचा पुनर्वापर केल्यास तयार होणारे ‘ट्रान्सफॅट’ टाळण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त तीन वेळेस वापर करावा. या नियमांचे जर उल्लंघन झाले तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. ज्या अन्न व्यावसायिकांकडून 50 लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर केला जातो, अशा व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुनर्वापराची लेखी माहिती ठेवावी. उपयोगात आलेल्या खाद्यतेलाची माहिती अन्न सुरक्षा व मानद प्राधिकरण, नवी दिल्ली या मान्यताप्राप्त संस्थेकडे द्यावी. तसेच, त्याबाबतचा अभिलेख जतन करावा अशी तरतूद आहे.
नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानद कायदा कलम 55, 57 व 58 आणि भा.दं.वि. कलम 272 व 273 यानुसार कारवाईची तरतूद आहे. एकदा वापर झाल्यानंतर या तेलाचा इतर कामांमध्ये उपयोग होऊ शकतो. जसे बायोडिझेल, साबण, वंगण आदी. त्यामुळे यासंबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कारवाई होणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.