शिरूर, पुणे : तीन वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने (Forest Department) जेरबंद केले आहे. शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक गावात गेल्या आठवड्यात बिबट्याने हा हल्ला केला होता. 20 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास घरासमोरील मोकळ्या अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात (Leopard attack) तीन वर्षीय चिमुरडा जखमी झाला होता. वन अधिकार्यांनी सांगितले, की घराशेजारी ऊसाचे शेत आहे. याठिकाणी बिबट्या लपून बसलेला असावा. कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी आरडाओरड करण्यापूर्वी बिबट्याने या मुलाला काही अंतरावर ओढले. अंगणाच्या शेजारी बांधलेल्या गोठ्यात बिबट्या जनावरांना (Cattle) लक्ष्य करण्यासाठी आला असावा, पण त्याऐवजी त्याने मुलावर हल्ला केला, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. दरम्यान, हा मुलगा सध्या दुखापतीतून सावरत आहे.
बिबट्याने चिमुरड्यावर हल्ल्या केल्यानंतर वनविभागाने परिसरात सतर्कता आणि गस्त वाढवली आहे. प्राण्याला पकडण्यासाठी अनेक पिंजऱ्यांचे सापळे लावण्यात आले होते. शिरूर वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हैसेकर म्हणाले, की आम्ही या मुलावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या बिबट्याची सुटका केली. या प्राण्याला वन्यजीव एसओएसच्या माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रात पाठवण्यात आले आहे. आम्ही परिसरात नियमित गस्त सुरू ठेवू.
खेड तालुक्यातूनही एका बिबट्याला वनविभागाने तीन दिवसांपूर्वीच पकडले होते. 45 वर्षीय महिलेवर या बिबट्याने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. खेड तालुक्यातील जौळके गावात राहणाऱ्या लता बोऱ्हाडे यांच्यावर 12 मे रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. रेतवाडी या गावाला 10 मे रोजी दोन महिलांवर हल्ला करण्यात आला होता. या तीन घटनांनंतर, वनविभागाने गस्त वाढवली आणि पिंजऱ्याच्या सापळ्याच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली.
रेटवडीतील दोन्ही हल्ल्यांची ठिकाणे एकमेकांपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहेत. 10 मे रोजी सायंकाळी 6.15च्या सुमारास घडलेल्या पहिल्या घटनेत रिजवाना अब्दुल पठाण यांच्या घरापासून काही अंतरावर बिबट्याने हल्ला केला. त्याच दिवशी रात्री 8.30च्या सुमारास अरुणा संजय भालेकर याच प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. आंबेगाव तालुक्यातील थोरंदळे गावात 11 मे रोजी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय ओंकार टेमगिरे याच्यावर पहाटे 5.30च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता.