पुणे : पदोन्नती नाकारल्यामुळे कंपनीच्या माजी महाव्यवस्थापकाने (General manager) डेटा प्रतिस्पर्धी कंपनीसोबत शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. यामुळे संबंधित कंपनीला दोन ते तीन कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.याप्रकरणी कंपनीने तक्रार दाखल केली आहे. आरोपीने कंपनीची महत्त्वाची बातमी प्रतिस्पर्धी कंपनीसोबत संमतीशिवाय शेअर केली. याप्रकरणी शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित महाव्यवस्थापकास मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदोन्नती नाकारण्यात आली होती, त्याने डेटा चोरला आणि तो प्रतिस्पर्धी कंपनीसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले, की आरोपीने एप्रिल 2021पर्यंत कंपनीचे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आणि सीईओ पदावर बढती (Promotion) न मिळाल्याने त्याने कंपनी सोडली. निराश होऊन आरोपी केवळ प्रतिस्पर्धी कंपनीत सामील झाला नाही, तर त्यांच्याशी व्यवसायाशी संबंधित डेटादेखील शेअर केला.
पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या एका कंपनीचा जर्मन विभाग देशभरात अन्न आणि औषधी उद्योग उभारण्यास मदत करतो. यात 100हून अधिक कामगार आहेत. आरोपी कंपनीचा व्यवसाय प्रमुख होता आणि त्याच्याकडे क्लायंट तपशील, उत्पादन डिझाइन आणि कंपनीची विपणन धोरणे यासारखी महत्त्वाची माहिती होती.
पोलिसांनी सांगितले, की 2021मध्ये, आरोपीने संचालक मंडळाशी संपर्क साधला आणि कंपनीच्या महाव्यवस्थापक पदावरून सीईओ अशी पदोन्नतीची मागणी केली. त्यावेळी संचालक मंडळाने त्यांना कळवले, की ते सीईओच्या निवडीसाठी कंपनीने ठरवलेल्या प्रक्रियेचे पालन करतील. एप्रिल 2021मध्ये आरोपीला समजले, की त्याला बढती मिळाली नाही. निराश होऊन त्याने कंपनी सोडली.
काही कालावधीत कंपनीला व्यवसायात तोटा होऊ लागला. तपासाअंती त्यांना त्यांचे माजी महाव्यवस्थापक यास जबाबदार असल्याचे समोर आले आणि त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी सांगितले, की तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आम्ही कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित माहिती संमतीशिवाय शेअर केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनने आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम 420 (फसवणूक) आणि 408 (विश्वासाचा भंग करणे) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.