पुणेः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले दांपत्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करूनही त्यांची राज्यातून हकालपट्टी झाली नाही. त्यांच्यानंतर सुधांशू त्रिवेदी, संजय गायकवाड, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून सातत्याने छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य केली गेली आहेत. तरीही महाराष्ट्राने हे सहन केले आहे. त्यामुळे आता जबाबदार व्यक्तीने केलेली बेताल वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही सहन करणार नाही असा इशारा देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातून आधी हकालपट्टी करा असा इशारा माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी दिला आहे.
त्यांनी पुण्यात बोलताना ज्या ज्या व्यक्तीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केली आहेत. त्याच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.
राज्यातील जबाबदार व्यक्तिंकडून जर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अवमान आणि वादग्रस्त वक्तव्य केली जात असतील तर ते चुकीचे आहे.
त्यामुळे आमच्या आदर्शांचा कोणी अपमान करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना महाराष्ट्रात थांबण्याचा अधिकार नाही असा इशाराही त्यांनी राज्यपालांना दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर अपमान होत असेल तर राजकीय मतभेत, पक्षीय राजकारण विसरून सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. मात्र तसे होताना महाराष्ट्रात दिसत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव फक्त राजकारणासाठी घ्यायचा हा नवा पायंडा पडत असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे. त्यामळे आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातून हकालपट्टी करा नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे.