पुणे : सख्ख्या भावाला कॅनॉलमध्ये ढकलून त्याचा खून (Murder) केल्याची घटना पुण्यात घडली आहे. डेक्कन परिसरातील घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्रास देतो, या कारणावरून भाऊ-बहिणीने दोघांच्या मदतीने भावाचा खून केला आहे. पंकज दिघे (वय 23, रा. डेक्कन जिमखाना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सुहास दिघे, अश्विनी अडसूळ, प्रशांत आणि महेश बाबुराव धनपावडे (वय 37, रा. देशमुखवाडी, शिवणे) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी (Fursungi) गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टच्या उसाच्या शेताजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये 18 मार्च 2017ला एक मृतदेह आढळला होता. त्यावेळी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.
डेक्कन पोलीस ठाण्यात पंकज दिघे बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पोलीस तपास सुरू होता. त्याचवेळी साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत घराच्या वादातून पंकज याला कॅनॉलच्या पाण्यात ढकलून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली.
दिघे यांचे एरंडवणा येथे एका चाळीत घर आहे. सुहास दिघे आणि त्यांची बहिण अश्विनी अडसूळ यांचा भाऊ पंकज दिघेने त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. त्यावरून त्यांनी प्रशांत आणि महेश धनपावडे यांनी सोबत घेऊन कट रचला. 14 मार्च 2017रोजी सायंकाळी पंकज याला तवेरा गाडीत घालून पळवून नेले.
गाडीत मारहाण केली. त्यानंतर हडपसर येथे असलेल्या कॅनॉलमध्ये ढकलून दिले. पाच दिवसांनी सुहास दिघे याने डेक्कन पोलीस ठाण्यात भाऊ पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तर त्याच्या आधीच हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यानंतर तपास करत आधी महेश धनपावडे आणि नंतर इतर आरोपींच्या चौकशीतून खून केल्याचे स्पष्ट झाले.