पुणे : लिफ्ट आणि मार्बल व्यवसायिकांना गंडा घालणार्या एका तोतया डॉक्टरला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) अटक केली आहे. तेजस अशोक शहा (वय 37, रा. कारेगाव, ता. शिरूर ) असे या तोतया डॉक्टरचे नाव आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, झारखंड आणि इतर राज्यातील 50 ते 60 व्यवसायिकांची त्याने फसवणूक (Cheat) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शहा याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे 9 गुन्हे दाखल आहेत. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसविण्यासाठी ऑनलाइन कोटेशन (Online quotations) मागवून त्यानंतर टेंडर पास झाल्याचे सांगत टेंडर फी आणि टेंडरसाठीची ई. एम. डी (अर्न मनी डिपॉझिट) रक्कम बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेत तो फसवणूक करत होता. डेंटल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केलेल्या शहाने नोकरी सोडून फसवणुकीचा धंदा सुरू केला होता.
टिंगरेनगर येथील एका व्यवसायिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली होती. फिर्यादींचा लिफ्ट बसविण्याचा व्यवसाय आहे. शहा याने त्यांना फोन केला होता. आपण तळेगाव येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथून बोलत असल्याचे त्याने सांगितले. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसवायची असल्याचे शहा याने फिर्यादला सांगितले. त्यानंतर हॉस्पिटलच्या मेलवर लिफ्ट बसविण्यासाठीचे कोटेशन त्याने मागवून घेतले. काही दिवसांनी परत त्यांना फोन करून तुमचे टेंडर पास झाले आहे. टेंडरची फी आणि ई.एम.डी रक्कम असे 56 हजार 400 रुपये एका बँक खात्यावर मागवून घेतले.
पैसे तर घेतले, मात्र त्यानंतरदेखील लिफ्ट बसविण्याचे काम दिले नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पैसे ट्रान्सफर झालेले खाते, ई-मेल, मोबाइल नंबरच्या तांत्रिक तपासावरून आरोपी शहा याला कारेगाव परिसरातील बाभूळसर येथून ताब्यात घेतले.
आरोपी शहाने डेंटल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला आहे. मुंबईत कृत्रिम दात तयार करणार्या कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र, काही दिवसानंतर त्याने ही नोकरी सोडून डॉक्टर असल्याची बतावणी करत लिफ्ट आणि मार्बल व्यवसायिकांना आर्थिक गंडा घालण्यास सुरूवात केली. आता त्याचे पितळ उघडे पडले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.