‘मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो’, गजानन कीर्तीकर यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

| Updated on: Nov 15, 2022 | 6:57 PM

शिवसेनेच्या ठाकरे गटात आपल्याला डावललं जात होतं. मी तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, असा आरोप गजानन कीर्तीकर यांनी केला.

मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, गजानन कीर्तीकर यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली. उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा खूप मोठा झटका मानला जातोय. दरम्यान, गजानन कीर्तीकर यांनी आपण शिंदे गटात का प्रवेश केला? याबाबत माहिती दिलीय. शिवसेनेच्या ठाकरे गटात आपल्याला डावललं जात होतं. मी तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, असा आरोप गजानन कीर्तीकर यांनी केलाय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली.

“मी 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो. मी शिंदे गटात जाण्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राजकीय प्रवास सुरू आहे तो घातक ठरणार आहे. त्यामुळेच शिंदे गटाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरे गटात जे खासदार गेले त्याचंही तेच कारण आहे आणि मी सुद्धा शिंदे गटात गेलो त्याचंही तेच कारण आहे”, असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं.

“अडीच वर्ष सरकार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आम्हाला दुय्यम स्थान मिळत होतं. अधिकारी जुमानत नव्हते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं प्रस्थ सुरू होतं. पडलेल्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळत होता”, असंदेखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मी नगरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आदेशानुसार तहसीलदार, ठाणेदार, एमएसईबीचे अधिकारी त्यांचं जे काम करतील त्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. हा सगळा प्रकार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांना आवाज देत होतो. आम्ही एकमुखी मागणी केली की, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जो प्रवास सुरुय तो थांबवा”, असं गजानन कीर्तीकरांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची गळाभेट घ्यायला गेले. दिशाहीन झालेली काँग्रेस, स्वार्थी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर युती करणं चुकीचं आहे”, असं ते म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापलं’

“मी 2004 साली जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं तिकीट कापण्याचं काम करत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की तिकीट दिलं पाहिजे”, असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं.

“मी नोकरी सोडून पक्षाचं काम करत होतो. त्यांनी मला 2004 ला तिकीट दिलं. पण उद्धव ठाकरे विरोध करत होते. अखेर 2009 ला माझं तिकीट कापलं. माझ्या पीएला बोलावून तिकीट कापल्याचं सांगितलं”, असं कीर्तीकर म्हणाले.

‘तिकीट कापलं पण ज्युनिअर सहकाऱ्याला मंत्रीपद’

“माझं तिकीट कापलं पण माझ्या ज्युनिअर सहकाऱ्याला मंत्रीपद दिलं. अरविंद सावंतांना दिलं. एनडीएतून बाहेर पडताना सचिवाला विनायक राऊतांना गटनेता केलं. माझ्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला डावललं”, असा खेद गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला.

‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो’

“मला सांगण्यात आलं की तुम्हाला काय हवंय? उद्धवजींनी जी संघटना चालवली त्यामध्ये मी काम केलं. पण माझं पुण्यातील काम खंडीत केलं. आणि सिनेअभिनेत्याला आणलं. खासदार अमोल कोल्हेंना काम दिलं. पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. अमोल कोल्हे सिरीअलमुळे लोकप्रिय झाले. आणि आढळराव हरले”, असं कीर्तीकर म्हणाले.

“औरंगाबादमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात रावसाहेब दानवेंचा जावई उभा राहिला आणि पैशांचा वापर केल्यामुळे हरला. त्यांनी खैरेंना राज्यसभा द्यायला हवी होती. मात्र प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा दिली. काँग्रेसचे नेते सांगतात की त्यांना साधी विधानपरिषदही दिली नसती. मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो”, असा दावा गजानन कीर्तीकरांनी केला.

मुलाच्या प्रश्नावर म्हणाले….

यावेळी गजानन कीर्तीकर यांना त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अमोल कीर्तीकर हे सध्या ठाकरे गटातच आहेत. या विषयावर गजानन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“तो माझ्या हातात हात धरून राजकारणात आला नाही. आमचं घरामध्ये ठरलं आहे. आमच्या घरात वाद नाही. तो मला म्हटला की मी शिवसेना सोडणार नाही. रोज आम्ही एकत्र बसतो आणि जेवण करतो. मी त्याला ये म्हणून सांगणार नाही. त्याचा त्याला अनुभव घेऊ दे”, अशी भूमिका गजानन कीर्तीकर यांनी मांडली.