योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : गौतमी पाटील, या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय. नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil) सर्वच कार्यक्रमांना एकच गर्दी असते. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई वाटेल ते करायला तयार असते. एका बाजूला तिचा डान्स पाहण्यासाठी एकच गर्दी होतेय. तर दुसऱ्या बाजूला गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय. त्यामुळे तिच्या डान्सवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समाजातील एका वर्गाकडून, संस्थाकडून करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या या सर्वच प्रकाराबाबत गौतमीला काय वाटतं हे तिने मनमोकळेपणाने TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलंय. (gautami patil exculusive interviews with tv9 marathi dancer what about said on demanded to close his show)
” कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांनाच याचं कारण माहिती असेल. मला वाटत नाही की बंदी घालावी. मला वाटतं की मी कुठेही चुकत नाही.चुकले तर मला तुम्ही सांगा की कार्यक्रमावर बंदी घाला. मागे जे झालं ते झालं. त्यानंतर मी कुठेही चुकलेले नाही. तुम्ही माझे अजूनही व्हीडिओ बघू शकता. सध्या मी सर्व व्यवस्थित करतेय. त्यामुळे बंदी घालावी असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया गौतमीने तिचा कार्यक्रम बंद करण्याच्या इतरांच्या मागणीवर दिली.
“आता अश्लील काहीच नाहीये. मागं जे झालं ते झालं. आता काहीच अश्लील नाही. त्यांना कुठं अश्लील दिसतं काय माहिती. बोलणाऱ्यांनाच माहिती की कार्यक्रमात अश्लीलता कुठे आहे ती. अश्लील काहीच सुरु नाही. सर्व व्यवस्थित कार्यक्रम सुरु आहे. मी आणि माझ्यासोबतच्या मुलीही छान डान्स करतात. अश्लील हावभाव करत नाही. पण लोकांना काय दिसतंय काय माहित. मी तर म्हणतेय कुठे दिसतंय मला? मला व्हीडिओ दाखवा की अमूक अमूक ठिकाणी चुकीचं वागलीय”, असं नम्रपणे गौतमीने म्हटलं.
“विरोधाचं कारण त्यांनाच माहिती, काय कारण असंल. आता त्यांच्या मनात काय आहे,”, अशी हसत गौतमीने प्रतिक्रिया दिली. तसेच कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद हे विरोधाचं कारण आहे का? यावर गौतमी म्हणाली की, ” असू शकतो किंवा नाही, माहिती नाही”.
“माझ्यामुळे कुणाचे कार्यक्रम थांबले असतील असं मला तरी वाटत नाही. मला नाही वाटत की माझ्यामुळे कुणाचं काही थांबलं असेल. ज्याची त्याची चॉइस असते की आज हा कार्यक्रम ठेवायचाय. लोकांना वाटतं माझा कार्यक्रम ठेवायचाय तर माझा कार्यक्रम ठेवतात. लोकांना वाटलं की आज गौतमी पाटीलचा कार्यक्रम नको, तर लोकं दुसरा कुणाचा कार्यक्रम ठेवतील. ज्याची त्याची चॉईस आहे. तो कार्यक्रम ठेवतो”, असं स्पष्टीकरण गौतमीने दिलं.
“प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळेच ते मला सपोर्ट करतायेत. प्रेक्षकांनी असंच प्रेम माझ्यावर राहु द्यावं. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी धन्यवाद देते. ते प्रेम आहे त्यांचं, म्हणून ते मला सपोर्ट करतायेत”, अशा शब्दात गौतमीने तिच्या चाहत्यांचे आभार मानले.
“लोकांना डान्स आवडतो, मी आवडते. त्यामुळे प्रेक्षकवर्ग कार्यक्रम पाहायला येतात. मोठ्या संख्येने गर्दी होते. बाकी काही नाही”, असं उत्तर कार्यक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल गौतमीने दिलं.
“ज्याचे त्याचे विचार आहेत. सपना ताईचंही खूप नाव आहे. तिच्यासोबत माझं नाव घेतलं जातं म्हणजे मला तसं म्हटलं जातं म्हणून छान वाटतं. ताईचं नाव काय साधं नाहीये, मला छान वाटतं”, अशी गौतमीने हसत हसत महाराष्ट्रची सपना चौधरी या उपमेबाबत प्रतिक्रिया दिली.
“त्यांचं काही चुकीचं नाही. मी नाही म्हणणार की त्या चुकतायेत. त्यांचं पण बरोबर होतं.
मला वरिष्ठ असलेल्यांचं काही चुकीचं नाही. कारण माझ्याकडून तशी चूक झालीच होती. अजूनही माफी मागते. मी चुकले होते, हे मान्य करते. त्यावेळेस काही चुकलं असेल तर आताही माफी मागते. मी खरंच चुकले होते म्हणून त्या मला बोलल्या होत्या. त्यानंतर मला समजावूनही सांगितलं. त्यामुळे त्यांचं बरोबर आहे. पण आता मला वाटतंय की मी कुठे चूकत नाहीये. कारण सर्व कायक्रम व्यस्थित चाललेत. कार्यक्रमात अश्लील हावभाव किंवा अश्वील काहीच नाहीये”, असं स्पष्टीकरण गौतमीने दिलं. गौतमीने मागे एका कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन लावणीसम्राज्ञींनी गौतमीवर जोरदार हल्लाबोल केला होता.
मी आधी धुडे सिंदखेडा गावाकडे होते. तिथे मी आजोबांसोबत (आईचे वडील) राहिले. माझे वडील लहानपणापासून सोबतच नाहीत. आई आणि मी आजोबांसोबतच राहिले. त्यांनीच मला सांभाळलं. मामाने आईचा संसार व्हावा यासाठी वडिलांना आणि आम्हा दोघांना अस तिघांना पुण्याला आणलं. पण वडील व्यवस्थित राहिले नाहीत. ते ड्रिंक करायचे. त्यामुळे त्यांना परत पाठवलं. मग परत आम्ही दोघंच राहू लागलो. आईने जॉब केला. मात्र आईचा पीएमटीमध्ये अपघात झाला. त्यानंतर मी या क्षेत्रात आले.
“आता कार्यक्रम तर आहेतच. साँग, सिनेमाचं काम मिळालं तर नक्की करणार”, असं उत्तर पुढील वाटचालीबाबत दिलं.
“1 जानेवारीला माझं लावणी साँग येतंय. लावणी खूप छान आहे. लावणी सर्वांनी बघा, प्रतिसाद द्या. तसेच घुंगरु या सिनेमाचंही काम सुरुंय”, असं गौतमीने सांगितलं.
“मला तर प्रेमच दिसतं सर्वांचं. सर्वच आमच्या कार्यक्रमाला लांबून येतात. तसं काही नाही. सर्वांचंच माझ्यावर प्रेम आहे. प्रेमचं दिसतं. बाकी काही नाही. छान सर्व”.
राजकारणात येण्याबाबत अजूनही काही विचारणा झालेली नाही. तसं काही नाही. मला कुणी काही विचारलेलं नाही. मला राजकारणात रस नाही. त्यात मी पडणार नाही, राजकारण अजिबात नाही”.