पुणे : जिल्ह्यातील घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्लाची सुपारी देणारे आणि हल्ला करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलिसांची (Police) जेरबंद केले आहे. घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे त्यांच्यावर 10 मार्च रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime branch) पथकाला सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला आरोपींविषयी माहिती मिळाली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. तर एक आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हे शाखेला माहिती मिळाली, की जितेंद्र प्रभाकर काळे याचे आडोसा नावाने नंदकुमार बोराडे यांच्या घराशेजारी परमिट रूम आणि बियर बार आहे. हा बियर बार बंद करण्याबाबत नंदकुमार बोराडे यांनी वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या तसेच जितेंद्र काळे यांनी बांधलेल्या रहिवाशी सोसायटीमधील सांडपाणी कॅनलमध्ये सोडले जाते. याबाबत नंदकुमार बोराडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे याने सदरचा गुन्हा केलेला आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, जितेंद्र काळे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता, त्याने त्याचा मुंबई येथील राहणारा त्याचा लहानपणीचा मित्र योगेश पवार व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून नंदकुमार बोराडे याला मारण्याची योजना आखली. त्यानुसार जाफर शमीम अहमद (वय 24 वर्षे, रा. मुंब्रा, मुंबई) व शबाझ मेमन यांनी एक चार चाकी व एक दुचाकी गाडीतून येवून हल्ला केला केला असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यांमध्ये जितेंद्र प्रभाकर काळे, योगेश मोहन पवार (वय 40 वर्षे, रा. घाटकोपर, मुंबई) जाफर शमीम अहमद (वय 24, रा. मुंब्रा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी फरार आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह पथकाने केली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.