शिंदे तुझसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही, असे आदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत दिल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली पाहिजे, कारण त्यांचे नाव घेऊन महायुतीमध्ये संभ्रम केला जात असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच नाव घेऊन इथ महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार हे जातीयवादाच विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे ह्या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळ शिकल्या आहे. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. जसा बाप तशीच लेक, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादीच्याच चर्चा घडवायच्या हे पवारांचे जुनेच फॅार्म्यूले आहेत. सुप्रिया सुळे अजित दादांवर सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकड लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. पण इथ सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण ‘ महाराष्ट्राला दाखवत आहेत, असं म्हणत पडळकरांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांनी आपण असे काही बोलले नसल्याचं म्हटलं आहे. हे वक्तव्य मी कुठे केले याचा व्हिडीओ दाखवा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.