पुणे : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी राज्यपाल कोश्यारी यंदा पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. त्याचबरोबर पुण्याजवळील सिंहगड किल्ल्याला भेट देत ते किल्ल्याची पाहणी करणार आहेत. तसंच लोणावल्यातील महावितरण कार्यालयालाही ते भेट देणार असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari will be on a three-day visit to Pune )
राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरुन चांगलाच वाद पेटला होता. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं होतं. राज्यपाल कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणाले. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं होतं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं होतं.
तत्पूर्वी, राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाड्यातील 3 जिल्ह्याच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला होता. दौऱ्याआधी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. राज्यपालांकडून राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यावर आता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
इतर बातम्या :
राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत जेपी नड्डांशी चर्चा झाली; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Governor Bhagat Singh Koshyari will be on a three-day visit to Pune