दौंड, पुणे : ग्रीन हायड्रोजन हे (Green hydrogen) भविष्यातील इंधन आहे. विमाने, वाहने असे सर्व काही हायड्रोजनवर चालेल. ऊर्जेला निर्यात करणारा भारत देश बनवायचा आहे, आकलनापलिकडे असेल तर लोकांना समजत नाही. हायड्रोजनवर गाडी चालू शकते, हे दाखवण्यासाठी मी गाडी वापरत आहे. देशातील पहिला ट्रॅक्टर मी सीएनजीमध्ये (CNG) रुपांतरीत केला. सीएनजीचे रुपांतर बायोएनर्जीत केले तर गॅस वाहतुकीची समस्या सुटेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सीबीजी गॅस प्रकल्पाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कारही करण्यात आला. देशाला आर्थिक स्वयंशक्ती बनवले पाहिजे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
इंधन क्षेत्रात आलपा देश 10 लाख कोटींचे पेट्रोल-डिझेल आयात करतो. मात्र 10 लाख कोटी जे आयातीसाठी जातात, त्यामधील पाच कोटी इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळावेत, असे ते म्हणाले. तर बांबूपासूनही इथेनॉल तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. एक लिटर पेट्रोलमध्ये किती गाडी चालेल तितकीच एका लिटर इथेनॉलमध्ये चालेल. जनरेटर सेट इथेनॉलवर चालले पाहिजेत, यासाठी किर्लोस्कर यांना बोललो आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवा, साखर उत्पादन कमी करा तरच शेतकरी वाचेल, साखर उद्योग वाचेल, असे ते म्हणाले. शेतकरी अन्नदाता आहे. तो आता ऊर्जादाता बनला पाहिजे. त्याशिवाय आपले जग बदलणार नाही. त्याचबरोबर गावे आणि शेतकरी हा समृद्ध आणि संपन्न झाले पाहिजेत, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
वाहनविषयक कायदे करणे माझ्याच हातात आहे. सगळ्यांनी प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर कसे करून घ्यायचे ते मला माहीत, असे मिश्कीलपणे ते म्हणाले. दरम्यान, 18व्या शतकात मोघल साम्राज्य, 19व्या शतकात इंग्रजांचे राज्य तर 21वे शतक भारताचे असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. भारत विश्वगुरू बनेल. सर्वत्र विकास होऊन शहराकडे गेलेली माणसे पुन्हा गावाकडे परततील. आम्ही अडचणीच्या काळात कारखाने सुरू केले. पाच गिनीज बुक रेकॉर्ड केले, असे त्यांनी सांगितले.