पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) ही देशातली नंबर एक भ्रष्टाचारी पार्टी आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा सर्रासपणे गैरवापर भाजपा करत आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात जे केले तेच दिल्लीत करण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप आपचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. देशातले एकूण वातावरण पाहता आम आदमी पार्टीची गरज आहे. आपच्या रुपाने एक सक्षम पर्याय मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी जनतेची नस पकडली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि पंजाब पॅटर्न आणला आहे. त्यामुळेच आम्ही मागील आठवड्यात त्यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही ओबीसीसाठी काम करतो. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर केजरीवाल यांच्याशी आमची चर्चा झाली, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
आधीच्या म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने गोंधळ घातला. नव्या सरकारने तर आल्या आल्या गोंधळ घालत महाविकास आघाडीला मागे टाकले आहे. मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि आरक्षणावरून एवढा गोंधळ घातला आहे, की उमेदवाराला कळायला मार्ग नाही, माझा वॉर्ड महिलेसाठी आहे की पुरुषासाठी. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी याविषयी खोटे सांगितले, असा आरोप राठोड यांनी केला आहे.
एकीकडे आम आदमी पार्टीची घोडदौड सुरू असताना 20 कोटींची ऑफर दिली जात आहे. महाराष्ट्रात तर 50 खोक्यांची चर्चा आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते सामान्य जनतेला आवडलेले नाही. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे अनेकजण आपकडे आशेने पाहत आहेत, असे ते म्हणाले.
देशात केंद्रीय यंत्रणांचा सर्रास वापर सुरू आहे. भाजपाचा एक नेता म्हणतो, राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागणारच नाही. म्हणजे कोर्ट काय निर्णय घेणार आहे, कोणाला अटक होणार आहे, हे यांना आधीच माहीत असते. ईडी, सीबीआयची कार्यालये कोण चालवते, तर ते भाजपा चालवतात, अशी टीका हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.