पुणे: जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला होता. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आणि काही प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले आहे. मात्र, पंचनाम्याची अंतिम कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल.
राज्यातील 8 ते 9 जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलं. चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
त्याचबरोबर पूरग्रस्तांना 2019च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :