पुणे : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी जे विधान केले ते अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नका करू दुनियादारी, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रवक्ते हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला अपमानास्पद असे वक्तव्य केले आहे, त्याचा सर्वच स्तरातून निषेध होत. आहे. राज्यपाल पदाचा मान कोश्यारींनी धुळीला मिळवला, अशाप्रकारची टीकाही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कोश्यारींना लक्ष्य केले आहे. मराठीसाठी आक्रमक असलेल्या मनसेने राज्यपाल कोश्यारींना दुनियादारी करू नका, असे सुनावले आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मनसेचे (MNS) म्हणणे आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी असे म्हणत हेमंत संभूस यांनी कोश्यारींवर हल्ला चढवला. तुम्ही मराठी द्वेशी असल्याचे वारंवार दाखवून देत आहात. संविधानिक पदावर असताना हे विधान करणे चुकीचे आणि संतापजनक असल्याचा आरोप संभुस यांनी केला आहे. त्याचसोबत राज्यपालांना महाराष्ट्र राज्याचा इतिहास माहीत नाही, अशी जहरी टीकादेखील संभुस यांनी केली आहे.
किती मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे, हे तुम्हाला माहीत नाही. मराठी माणसांनी महाराष्ट्र उभा केला, त्या महाराष्ट्राकडे गुजराती, राजस्थानी आकर्षित झाला. तो निर्भयपणे इथे व्यवसाय करू लागला. आपण काय बोलतो, कुणाविषयी बोलतो, याचे भान कोश्यारी तुम्ही राखले पाहिजे, अशी आठवण त्यांनी करून दिली. त्याचबरोबर आमच्याकडून स्वत: ला अपमानित करून घेऊ नका, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि मराठी माणसांसदर्भात अपमानजनक वक्तव्य करताना कोश्यारी म्हणाले होते, की महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही. दरम्यान, या वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे.