पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा. नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यानंतर आज सकाळीच प्रशासनाने त्या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केली. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण माहीममधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत का दिली? असा सवाल केला आहे. तसेच पुण्यातील मनसेच्या जुन्या कार्यालयासमोर अशीच मशीद उभी राहिली त्याचं काय? असा सवालही आनंद दवे यांनी केला.
राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचा देखील मुद्दा उपस्थित करावा. औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू. त्याची कबर संभाजीनगरमध्ये कशाला हवी? राजसाहेब प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत. औरंगजेबच्या कबरीबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा. राज ठाकरे यांनी पुण्यश्लोक आणि शनिवार वाड्यातील दर्ग्याचा मुद्दा का नाही उचलला? असा सवाल करतानाच शनिवार वाड्यातील दर्गा देखील अनधिकृत आहे. त्याविरोधात हिंदू महासंघ आंदोलन करणार असल्याची घोषणा आनंद दवे यांनी केली आहे.
समुद्रातील अनधिकृत मशिदीचा विषय भोंग्यासारखा होऊ नये. दर पाडव्याला फक्त सरकारला सूचना देऊ नका. अनधिकृत मशीद शेजारी मंदिर कशासाठी? त्यातून मुस्लिम समाजाचे काय नुकसान होणार आहे? त्यापेक्षा ते बांधकाम थांबवा आणि त्यासाठी महिन्याची मुदत कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला. मुस्लिम समाजाबाबत राजसाहेब थोडे मवाळ झालेत. भाजपला मैदान मोकळं झालं आहे, असंही ते म्हणाले.
सांगलीतील मशीद कळली. पण पुण्यातील मनसेच्या जुन्या कार्यालयासमोर अशीच मशीद उभी राहत असताना मात्र कोणालाच कळल नाही. आजही लाऊड स्पीकर सुरू असल्याच हिंदू महासंघ सांगतच होता. ते आज मान्य केलं. मध्यंतरी स्पीकर बंद झाल्याचं सांगितलं जात होतं. राज साहेबांना पण मुस्लिम हवेच आहेत मग भोंग्याच काय? असा सवालही त्यांनी केला.
भोंगे कमी आणि बंद झाल्याची आकडेवारी राज ठाकरे यांनी दिली होती. पण काल राज ठाकरे यांनी स्वतःच मान्य केले की राज्यात भोंगे अजून देखील सुरू आहेत. आजही दर शुक्रवारी नमाज होतात. हनुमान चालीसा किती प्रमाणात चालू झाल्या? असा सवालही दवे यांनी राज ठाकरे यांना केला आहे.