शिवरायांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता, सत्ता लालसेसाठी नव्हे; अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण

| Updated on: Feb 19, 2023 | 1:28 PM

शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे.

शिवरायांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता, सत्ता लालसेसाठी नव्हे; अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण
Amit Shah
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एका राजाचं जीवन नाहीये. तर हा एक विचार आहे. हा विचार मानणारे अनेक लोक हे शिवसृष्टीचं काम पुढे नेतील. या कामात हजारो लोक सामील होतील. ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता, असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

शिवाजी महाराजांचं जीवन सत्ता लालसेचं नव्हतं. शिवाजी महाराजांचं जीवन स्वराज्य स्थापन करण्याचं होतं. संघर्षाचं होतं. शिवाजी महाराज हे साहसी राजे होते. ते स्वत: लढाईत पुढे असायचे. लढाईचे नेतृत्व स्वत: करायचे. फारच थोडे राजे आहेत की जे स्वत: फ्रंटवर असायचे. त्यापैकी शिवाजी महाराज एक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अशा कितीतरी लढाया आहेत. ज्या त्यांनी स्वत: लढल्या आहेत. एवढा शूरवीर राजा या धरतीवर झाला नाही, असं प्रतिपादन अमित शाह यांनी केलं.

आज शिवसृष्टीचं लोकार्पण होत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकार होत आहे. आज शिवजयंतीही आहे. लोकार्पणासाठी शिवजयंतीचा मुहुर्त योग्यच आहे. यापेक्षा वेगळा योग्य मुहुर्त असूच शकत नाही, असं शाह म्हणाले.

सर्वात मोठं थीम पार्क

शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचतील. शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल. शिवसृष्टी साकारणं हे ईश्वरीय काम आहे. शिवसृष्टीतून इतिहासाला उजाळा मिळेल. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्त्वाचं स्थळ ठरेल, असं ते म्हणाले.

संपत्तीचा वापर स्वत:साठी केला नाही

शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे, असं सांगतानाच शिवाजी महाराजांप्रमाणेच पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ, सोमनाथांच्या मंदिराचे पूर्णनिर्मिती केली, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संपत्तीचा वापर कधीच स्वतःसाठी केला नाही, असंही ते म्हणाले.

शिवाजी महाराज हा विचार

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. गुजरातमध्ये 8 जिल्ह्यात जाणता राजा नाट्यसोबत मी गेलो होतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठे उपकार केले आहेत. या लोकापर्ण सोहळ्यात सहभागी झालो स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा एक संदेश घेऊन जाणार. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे, असं त्यांनी सांगितलं.