पुणे : मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही, या एका वाक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय निकाली काढला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावत भाषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर औरंगजेब (Aurangzeb) कबर आणि इतर मुद्द्यांवरून त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच आपण बोलून अधिक महत्त्व द्यायचे नाही, असा टोलाही लगावला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशन समारंभास आले असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली पण अधिक बोलण्यास मात्र नकार दिला.
शरद पवार यांना औरंगजेब सुफी संतच वाटत असेल तर काय बोलायचे? सुफी संत अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता. मग काय शिवाजी महाराज मध्ये आले होते का, असा सवाल त्यांनी केला. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तर भाषणाच्या सुरुवातीला पावसातल्या शरद पवार यांच्या भाषणावरून त्यांना टोला लगावला होता.
शरद पवार सांगतात, आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री शिवसेनाप्रमुखांसोबत जेवायचो. तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढीही अक्कल नाहीये, तुम्ही कुणाबरोबर राहताय. लोकांना वाटेल यांचे खोटे खोटे भांडण चालायचे. पण हे सत्तेत इकते मश्गूल आहेत, की त्यांना कशाचीही पर्वा नाही. कारण जनता बेपर्वा आहे. लोक विसरतात आणि भलत्या गोष्टीवर मतदान होते, अशी खोचक टीकाही त्यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. मात्र शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोलणे टाळले.