पुणे : कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खात्री नव्हती. खुद्द शरद पवार यांनीच याची माहिती दिली. पवारांना कसब्यात यश येणार नाही. असं का वाटलं? याची माहितीही शरद पवार यांनी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे विधान केलं.
कसब्यात यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. हे मुख्य कारण आहे. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलं होतं. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असं वाटत होतं, असं शरद पवार म्हणाले.
पण शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली. भाजपने बापट आणि टिळक यांना डावलून निर्णय घेतल्याची कुजबुज ऐकू येत होती. त्यामुळेच बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले तर त्याचा फायदा होईल असं वाटतं होतं. निवडणूक झाल्यावर मी माहिती घेतली. ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ते वर्षानुवर्ष लोकांशी संबंधित होती. धंगेकर लोकांचे कामं करत होते. धंगेकरांशी माझी फार ओळख नाही. पण हा उमेदवार चार चाकीत कधी बसला नाही. दोन चाकीत बसला. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचं सर्वांचं लक्ष यांच्याकडे होतं. त्यामुळे त्याचा लाभ होईल हे माहीत होतं. महाविकास आघाडीचे सर्व घटक मनापासून राबले. तसेच धंगेकर यांची मेहनत यामुळे हा फायदा झाला, असं पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याची चर्चा माझ्याशी झाली नाही. त्या चर्चेत मी नाही. माझे सहकारी आहेत. ते निर्णय घेतील. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल. एकत्र लढण्यावर भर देऊ. लोकांना बदल व्हावा असं लोकांना वाटतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडी विधानसभेला 200 आणि लोकसभेला 40 जागा निवडून येईल असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावर, संजय राऊत पत्रकार आहेत. त्यांचा अभ्यास असतो. त्यामुळे त्यांनी काही आकडा सांगितला असेल. मला आकडा सांगता येणार नाही. पण लोकांना मी भेटतोय. तर लोकांना बदल हवा आहे. लोक मला सांगत आहे. आम्हाला बदल करायचा आहे, असं लोकं बोलत आहेत, असंही ते म्हणाले.