पुणे: लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नेते सोशल मीडियावर फोटो टाकतात. पण माझा फोटो टाकला तर जे लोक येणार आहेत, तेदेखली लस घेण्यासाठी फिरकणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. इतर नेते कदाचित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घेतानाचे आपले फोटो शेअर करत असतील. पण मी लस घेतानाचा माझा फोटो टाकला तर लोक अजिबात लसीकरणासाठी फिरकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. (DCM Ajit Pawar on Coronavirus situation in Pune)
ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी पुणेकरांना निर्वाणीचा इशारा दिला. पुण्यात 2 एप्रिलपर्यंत रुग्ण सापडण्याचे प्रमाण इतकेच राहिले तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना याबद्दलची चर्चा करण्यात आली.
पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असेही अजित पवार म्हणाले.
यानुसार पुण्यातील शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार आहे. तसेच पिंपरीचे जम्बो हॉस्पिटल 1 एप्रिलपासून सुरु करणार आहोत. पुण्यातील ससून रुग्णालयातील 500 बेड्सची व्यवस्था करणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.
येत्या शुक्रवारी लॉकडाऊन संदर्भात नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या आठवड्यापासून पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच एपीएमसीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील. नागरिकांना धान्य किराणा भरून ठेवण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे अजित पवारांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
खासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशारा
(DCM Ajit Pawar on Coronavirus situation in Pune)