सुनील थिगळे, प्रतिनिधी, पुणे : सध्या शिंदे गटात असलेले आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडी असल्याने तसेच शिरुरच्या जागेवर विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिरूरची जागा अमोल कोल्हे यांना सोडणार असल्याची चर्चा होती. याच कारणास्तव आढळराव पाटलांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली. मात्र भाजपने शिरूर मतदारसंघ काबीज करण्याचा प्लॅन आखून आढळरावांना धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीला आणखी एक वर्षांचा अवधी असला तरी भाजपने रणमैदानाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. अनेक केंद्रीय मंत्रांचे दौरे शिरूर मतदार संघात झाले. शिरूरमध्ये भाजपचा झेंडा रोवला जावा, यासाठी प्रयत्न ही सुरू केलेले पाहायला मिळते.
उत्तर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पक्षाची मोठी ताकद आहे. असे असतानाही लोकसभेला उमेदवार विजयी होत नाही, याची सल राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना होती. त्यामुळे विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या आढळराव-पाटील यांना शह देण्यासाठी त्यांच्याच पक्षातील डॉ. अमोल कोल्हे या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्याला राष्ट्रवादीने आपल्या पक्षात आणले. अतिशय चुरशीच्या लढतीत अंतिमतः राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर एकदाचा ताबा मिळवला.
शिवसेना -भाजप युतीच्या सरकारची स्थापना करण्यात आली त्यावेळी ज्यांचे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी त्या जागा लढवाव्यात असं ठरलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगल्या प्रकारे गटबंधन सुरू केले आहे. शेवटी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य राहणार असल्याचे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी सांगितले आहे.
भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशातील लोकसभेवर लक्ष केंद्रित करत आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केव्हा निवडणूक लढविली नाही त्याठिकाणी कमळ फुलविण्याचे संकेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी शिरूर लोकसभेत पत्रकार परिषद घेऊन दिले.
यातच शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर झळकले. शरद पवार यांनी पुन्हा अमोल कोल्हे हेच उमेदवार राहतील, असे जाहीर करत विलास लांडे यांना शह दिला. त्यामुळे आगामी लढाई पुन्हा आढळराव पाटील विरुद्ध डॉ. कोल्हे अशी रंगणार असे अपेक्षित होते.
परंतु, भाजपनेही या मतदारसंघावर फासे फेकले. आता महेश लांडगे यांनी ही लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. आम्हीही तयारीत आहोत, असा इशारा राष्ट्रवादीसोबत मित्रपक्षालाही दिला. या मतदारसंघातून दिल्ली गाठण्याचे स्वप्न पाहण्याचे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे सहमती दर्शवली. यामुळे शिरूर मतदारसंघातील रंगत वाढली आहे.
भाजपने शिरूरवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात कधीही काहीही घडामोडी घडू शकतात. त्याचा प्रभाव शिरूरमध्ये जाणवणार आहे. त्यामुळे भाजपची मिशन 2024 तयारी सुरू करत भाजपने लढाईची तयारी केली आहे. असे असतानाच आता महेश लांडगे यांनी शिरूर मतदार संघात भाजपने उमेदवारी दिली, तर नक्कीच रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.