पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार (Heavy rain) आणि संततधार सुरू असून यामुळे पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरासोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. या दमदार पावसामुळे धरणांची पाणीपातळीही (Increase in water level of dams) वाढण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण 76 टक्के भरले आहे. खडकवासला नवीन उजवा कालव्यातून 1005 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण सध्याच 76 टक्के भरले आहे. तर पाऊस अजूनही सुरू आहे. पुढचे काही दिवस पावसाची हजेरी दमदार स्वरुपातच राहणार आहे. हवामान विभागानेदेखील (IMD) तसा अंदाज वर्तवला आहे. पुढचे काही दिवस पाऊस बरसतच राहणार आहे. त्यामुळे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाजही व्यक्त होत आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू आहे. कोणत्या क्षेत्रात किती पाऊस झाला, त्या आकडेवारीवर एक नजर – (धरण पाणीसाठा अपडेट, आकडेवारी 11 जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत)
या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 9.47 टीएमसी झाला आहे. तर खडकवासला धरण 76 टक्के भरले असून धरणात आतापर्यंत 9.47 टीमसी पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पुण्यात पाणीकपात करण्याचीदेखील वेळ पुणे महापालिकेवर आली होती. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्याचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले होते. मात्र साधारण 7 जुलैपासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे.
मागील आठवड्यात मुंबईसह पुणे आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, 14 जुलैपर्यंत म्हणजे आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी दुपारनंतर शहरातील सर्व भागांत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे जूनमध्ये अवघ्या 34 मिमीवर असणार्या हंगामातील पावसाने 150 मिमीचा टप्पा रविवारीच पार केला.