इंदापूर : यश मिळवायचं असेल तर जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे ऑप्शनला टाकता येत नाही. त्यासाठी या तिन्ही गोष्टी सातत्य ठेवून कराव्या लागतात. तसं केलं तर यश मिळतंत, हे नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने खरं करुन ठाकवलंय. इंदापुरातील (Indapur) एका गावातील मुलीला एका प्रतिष्ठीत तेल कंपनीच्या ब्रॅन्ड एम्बेसिडर म्हणून झळकण्याची संधी मिळालीय. यामुळे गावातील या मुलीवर संपूर्ण इंदापुरात कौतुकाचा वर्षाव होतोय. या मुलीचं नाव आहे, ऐश्वर्या काटकर (Aishwarya Katkar). इंदापूरच्या वडापुरी या गावातील ऐश्वर्या इयत्ता नववीत शिकते. अभ्यासातही हुशार असणाऱ्या ऐश्वर्याला एका गोडतेल कंपनीच्या ब्रॅन्ड एम्बेसिडर (brand ambassador) म्हणून झळकण्याची संधी मिळालीय. या निमित्ताने मुलामुलींमध्ये कला गुण असतात. पण त्यांना संधी मिळण्याची गरज असते, हे देखील पुन्हा अधोरेखित झालंय.
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील रहिवासी असणाऱ्या एका शेतकरी कुटुंबात ऐश्वर्याचा जन्म झाला. अतिशय जिद्दी, मेहनती आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या ऐश्वर्याला एका गोडेतेल कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसिटर म्हणून झळकण्याची संधी मिळाली. तिचे पोस्टर सध्या वेगवेगळ्या ठिकाणी झळकलेत. एक मॉडेल म्हणून मिळाली ही संधी तिच्या करीअरला कलाटणी देणारी ठरेल, असा विश्वास तिच्यासह तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
यानिमित्ताने ग्रामीण भागातील मुला- मुलीनं मध्येही कला गुण असतात, फक्त त्यांना संधी मिळणे गरजेचे असते हे अधोरेखित झालंय. मूळचे वडापुरीचे असलेल्या सतीश काटकर व सीमा काटकर यादाम्पत्याची ऐश्वर्या ही कन्या बावडा येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववी शिकत आहे. वडील सतीश काटकर यांचा अकलूज येथे लाकडी घाना तेलविक्रीचा व्यवसाय आहे. ऐश्वर्या ही मोकळ्या वेळेमध्ये आपल्या आई वडिलांना व्यवसायामध्ये हातभार लावते. तिचे उद्योग, व्यवसायातील गुण, मार्केटिंगची कला, बोलण्याचे चातुर्य हे गुण कंपनीने हेरून इयत्ता नववीत शिकत असणाऱ्या ऐश्वर्याला रहस्य ऑईल ऑर्गेनिक कंपनीने अजीवन ब्रँड विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. सध्या ऐश्वर्या काटकर ही ग्रामीण भागातील मुलींसाठी आयडॉल ठरत आहे.