भैय्या, भाऊ की मामा? इंदापूरच्या जनतेचा कौल कुणाला?; मतदारसंघाची राजकीय स्थिती काय?

| Updated on: Oct 24, 2024 | 3:50 PM

Indapur Constituency Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. 288 मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रात काय घडतंय? पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती काय आहे? वाचा सविस्तर...

भैय्या, भाऊ की मामा? इंदापूरच्या जनतेचा कौल कुणाला?; मतदारसंघाची राजकीय स्थिती काय?
दत्तात्रय भरणे, प्रविण माने, हर्षवर्धन पाटील
Image Credit source: Facebook
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही यंदा अटीतटीची लढत होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील आणि विशेष करून इंदापूर तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. माजी मंत्री दत्ता भरणे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील रिंगणात आहेत. तर सोनाई दूध संघाचे प्रविण माने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदा इंदापूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

यंदा बदललेली समिकरणं

2019 ला हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र आता पाच वर्षांनंतर इंदापूरमधील राजकीय परिस्थिती बदलली. राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार समर्थक आमदारांसह भाजपसोबत गेले. इंदापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्ता भरणेदेखील अजित पवारांसोबत गेले. सिटिंग जागांवर त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. दत्ता भरणेंचं तिकीट जवळपास निश्चित झालं. मग हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि आता आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला आहे.

दुसरीकडे जेव्हा दत्ता भरणे अजित पवारांसोबत गेले. तेव्हा सोनाई दूध संघाचे संचालक प्रविण माने यांनी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत मदत केली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळणार असल्याचा विश्वास प्रविण माने यांना होता मात्र ऐनवेळी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेत तिकीट दिल्याने प्रविण माने नाराज झालेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे यंदा इंदापूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

2019 चा निकाल

2019 ला इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरूद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत झाली. यावेळी अत्यंत अटीतटीची लढत झाली. यात दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला. दत्ता भरणे यांना 1 लाख 14 हजार 960 मतं मिळाली. तर हर्षवर्धन पाटील यांना 1 लाख 11 हजार 850 मतं मिळाली. 3 हजार 110 मतांनी दत्ता भरणे यांचा विजय झाला.