पुुणे : मागच्या आठवड्यात जालना येथे मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा नववा दिवस आहे. आंदोलनस्थळी सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा जीआर तात्काळ काढावा, अशी त्यांची मागणी आहे. पण एकदिवसात काढलेला जीआर कोर्टात टिकणार नाही, त्यासाठी कमीत कमी 30 दिवस द्या अशी सरकारची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला चार दिवसाचा फायनल अल्टिमेटम दिला आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे सरकारला लवकरच या विषयावर ठोस भूमिका घ्यावी लागेल.
“मराठा समाजाचे पुढारी एकनाथ शिंदे, शरद पवार, अशोक चव्हाण या मराठा पुढाऱ्यांनी आता स्वतः तोडगा काढावा” असं वंचित बहुजन आधाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. “सरकारने आता तोडगा नाही असं सांगितलं, तर मग यांनी पुढे आलं पाहिजे. मराठा समाजातील सर्व पुढाऱ्यांनी तोडगा मांडावा” असं प्रकाश आंबेडकर यांनी आवाह केलं. आंदोलनात काँग्रेस तेल टाकण्याचं काम करत आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. “महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणावरून जो ब्लेम गेम सुरू आहे, तो योग्य नाही” असही ते म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर दोघेही तितकेच जबाबदार आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इंडिया विरुद्ध भारत, दोन दिवसात भूमिका जाहीर करणार
“इंडिया विरुद्ध भारत या वादात विरोधी पक्ष हा भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकत चालला आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “संपूर्ण इंडिया आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे. भारत आणि इंडिया हे एकमेकांच्या विरोधात नाही. मी इंडियाचा भाग आहे की, नाही येत्या दोन दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार आहे” अस प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यात ओबीसी, मराठा आणि मराठा वंजारी वाद लावायचं सध्या काम सुरू आहे असं ते म्हणाले.