पुणे – शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena)शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे (Vasant More )यांचे नाव वगळण्यात आले आहे. वसंत मोरे हे कोअर कमिटीचे सदस्य असतांनाही नाव वगळण्यात आलं आहे. नाव वगळण्यात आल्याने वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील काही स्थानिक नेते हे जाणून बुजून करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. पत्रिकेत नाव वगळण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. स्थानिक नेत्यांनी जाणूनबुजून नाव वगळले आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र मी आजही राजमार्गावर (Rajmarg)आहे कायम राहणार असल्यचेची वसंत मोरे यांनी बोलून दाखवले आहे. यामुळे मनसेतील अंर्तगत कलह पुन्हा एकदा उघड झाला आहे.
शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही वसंत मोरे यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे हे कुणाची कॉपी करत नाहीत, राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत. राज ठाकरेंच्या 2 सभानंतर सर्वांना जाग आलीय, आधी सगळे झोपले होते , अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. संभाजीनगर नामकरण करायचे हे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, आता उद्धव ठाकरे नामकरण नको म्हणतायत. राज ठाकरेंनी फक्त दोन सभा घेतल्यात, पुढे ते प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार आहेत, त्यावेळी सर्वांची पळापळ होणार असल्याचेही म्हटले आहे.
पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती. मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे, असे ते म्हणाले होते. त्याचबरोबर राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, शहराध्यक्ष पद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मोरे कोअर कमिटीसोबत पोलीस आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा दिसून आला. पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात सुसंवाद काय संवादही नाही, अशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली होती. एकूणच काय तर पुणे मनसेत वसंत मोरे सध्या एकाकी पडले आहेत. त्यांना इतर पदाधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र असे असूनही आपण पक्षातच आहोत, राजमार्गावर आहोत, असे ते वारंवार सांगत आहेत.