पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाइल फोन आणि लॅपटॉपची चोरी (Theft) करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद (Arrest) करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना (Police) यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन परराज्यातील चोरांना अटक करत चोरीचे 30 मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात 10 चोरीचे गुन्हे दाखल असून सौंदाराजन गोविंदा आणि बालाजी सल्लापुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोनही आरोपींना शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये 10 मार्चला मयूर पवार (रा. पाबळ) यांनी लॅपटॉप आणि मोबाइल चोरीची तक्रार दाखल केली होती. अशा घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपास करत असताना पथकास आरोपी कोरेगाव भीमा येथे असल्याचे लक्षात आले. सापळा लावून दोन्ही संशयित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक तपास केला असता त्यांनी कोरेगाव भीमा, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव, सणसवाडी, वाघोली यासह इतर अनेक ठिकाणी मोबाइल आणि लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडील एका बॅगमध्ये तपास केला असता 30 मोबाइल, दोन लॅपटॉप असा जवळपास साडे तीन लाखांचा मुद्देमाल सापडला. 10 गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.