पुणे : आयर्नमॅन म्हणून परिचित असलेले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदावरून आता त्यांची बदली झाली आहे. आज सकाळी कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग (Govind Baug) येथे आले आणि त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटे संवाद सुरू होता. आता त्यांनी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली, हे मात्र समजू शकलेले नाही. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ही खासगी भेट होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, त्यानंतर ते तेथून निघून गेले.
शरद पवार यांनाही माध्यमांशी यावेळी संवाद साधला नाही. त्यांना कोल्हापूरला जायचे असल्याने ते त्याच कामात होते. दुसरीकडे, अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल, याचीही चर्चा सुरू झाली होती. कृष्णप्रकाश यांना या बदलीबाबत कोणतीही माहिती नव्हती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते. या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर तर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली नसावी ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.