पुणे : क्रेडिट कार्ड अपडेट (Credit card update) करण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक झाली आहे. येरवडा येथील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सहयोगी संचालकाची क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक (Cheating) करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला 7.5 लाख रुपयांची ही फसवणूक करण्यात आली होती. या आरोपावरून चतु:श्रृंगी पोलीस अहमदाबाद येथील एका व्यक्तीचा आणि बीडमधील त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात या दोघांनी बालेवाडी येथील रहिवासी असलेल्या पीडित व्यक्तीला एका बहुराष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन केले आणि आपले क्रेडिट कार्ड अपग्रेड करायचे आहे आणि तसे न झाल्यास ते ब्लॉक केले जाईल, असे सांगितले आणि त्याच्या बँक खात्यातून लाखो रुपये उकळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज सादर केला होता आणि एक फोनही दिला होता, जो फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना तो डिजिटल व्यवहारासाठी दिला होता. फोनचे डिजिटल तपशील आणि क्रेडिट कार्ड तपशील तपासल्यानंतर, पोलिसांनी सोमवारी फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला.
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉलरने पीडित व्यक्तीला एक फोन आणि एक सिम कार्डदेखील पाठवले. ते बँकेचे धोरण असल्याचा दावा करत, आधीच अपलोड केलेला ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी त्याचा वापर करण्यास सांगितले. पीडित व्यक्तीने कॉल करणाऱ्यांची ओळख न पटवताच ते सांगतील त्या सूचनांचे पालन केले. त्याने फॉर्ममध्ये त्याच्या क्रेडिट कार्डचे सर्व तपशील उघड केले. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या कार्डचा तपशील वापरून एकूण 7.5 लाख रुपये 11 पैसे काढले.
बीडमधील एका खासगी बँकेच्या खात्यात आणि नंतर अहमदाबादमधील दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेला पत्र लिहून दोन्ही खात्यांचा तपशील मागितला असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना ओळख पटल्याशिवाय तो करू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.