पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे जून्नरचे आमदार (NCP MLAs) अतुल बेनके आज राखी मॅन बनले. जवळपास 7 हजार 500 महिलांनी त्यांना राखी बांधल्या. दोन्ही हात राखींनी भरून गेले. आमदाराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचा हा लुक पाहावा असाच आहे. अतुल बेनके यांनी त्यांच्या फेसबूकवर (Facebook) हे फोटो व्हायरल केलेत. दोन्ही हात राखींनी भरून गेले आहेत. भगिनींची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. भगिनींच्या गराड्यात आमदार महोदय आहेत. स्वतः ते सेल्फी (Selfies) घेत आहेत. त्यामुळं भगिनींचा आनंद द्विगुणित झाला आहे.
राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ बहिणीमधील हळुवार प्रेमळ नात्याचा सण. मायेने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते तो दिवस. भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक व बहीण-भावाचे अतूट नाते सांगणारा हा सण. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुन्नर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अनेक भगिनींनी नारायणगाव येथील निवासस्थानी येऊन अतुल बेनके यांना प्रेमाने आपुलकीने राखी बांधल्या आणि रक्षाबंधन सण साजरा केला. या दिवसाची अतुल बेनके दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या बहिणींना भेटून आनंद व्यक्त करतात.
आज दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या भगिनींनी आजचा दिवस अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, अशी प्रतिक्रिया अतुल बेनके यांनी व्यक्त केली. आपल्या या जिव्हाळ्याच्या नात्याची कायम जाण ठेवून, सचोटीने, उत्साहाने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा आज मला मिळाली. हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील, याची खात्री देतो, अशी ग्वाही अतुल बेनके यांनी दिली.