पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीत (Kasba By-Election) नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढलीय. पण निकालाआधी निवडणूक आयोगानं (Election Commission) दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना दणका दिलाय. निवडणूक आयोगाकडून धंगेकर आणि रासनेंवर गुन्हा दाखल झालाय. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांवरही (Rupali Patil) आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंद झालाय. विशेष म्हणजे कसब्याची पोटनिवडणूक मतदानाआधी जशी गाजली तशीच ही निवडणूक मतदानानंतरही चर्चेत आलीय. कारण 3-3 जणांवर गुन्हे दाखल झालेत. ज्यात कसब्यातल्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचाच समावेश आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय. आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांवरही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.
भाजपचे उमेदवार हेमंत रासने भाजपचं कमळ चिन्ह असलेलं उपरणं घालून मतदान केंद्रावर आले. मतदानावेळीही रासनेंनी भाजपचं उपरणं घालूनच मतदान केलं. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी आक्षेप घेत, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून रासनेंच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा अदखलदात्र गुन्हा दाखल केलाय.
हेमंत रासनेंपाठोपाठ काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र धंगेकरांवरही गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. रवींद्र धंगेकरांनी मतदानाच्या एकदिवसआधीच उपोषण केलं. पोलिसांच्या मदतीनं पैसे वाटपाचा आरोप धंगेकरांनी भाजपवर केला. प्रचार संपलेला असतानाही आरोप करत धंगेकरांनी कसबा गणपतीसमोर उपोषण केलं होतं. त्यानंतर धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झालाय.
हे झालं उमेदवारांचं. पण पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांवरही आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. रुपाली पाटलांनी मतदानाच्या दिवशीच EVM मशीनचा फोटो ट्विट केला होता. यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांसमोरचं बटण फोटोत हायलाईट झाल्याचं दिसतंय.
ट्विट करताना रुपाली पाटलांनी लिहिलंय की, शुभ सकाळ. कसब्याच्या नव्या पर्वाची, कामाची सुरुवात. आपला माणूस कामाचा माणूस. कसबा मतदारांचा. त्यामुळं मतदान यंत्राचा फोटो व्हायरल करुन मतदान गोपनियतेचा भंग केल्यानं रुपाली पाटलांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर इकडे रवींद्र धंगेकरांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरांवर पैसे वाटपाचा आरोप केलाय. प्रचार संपल्यावर पैशांचं वाटप झालं, असा आरोप धंगेकरांचा आहे.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुका, उमेदवारांची निवड असो. प्रचार असो की मग आरोप-प्रत्यारोपांनीही चांगल्याच गाजल्या. दोन्ही ठिकाणी जवळपास 50 टक्के मतदान झालंय. आता निकालातून स्पष्ट होईल की, नेमका कोण कोणावर भारी पडतंय ते.