पुणे : आता बातमी आहे पोटनिवडणुकांची. पुणे जिल्ह्यात कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपनं आपले दोन्ही उमेदवार घोषित केलेत. मात्र कसब्यातून तिकीट न मिळाल्यानं दिवंगत मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी नाराजी व्यक्त केलीय. तर महाविकास आघाडीनंही ताकदीनं लढण्याची तयारी केलीय. पाहुयात पोटनिवडणुकींवरचा हा स्पेशल रिपोर्ट.
कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. भाजपनं कसब्यातून टिळकांच्या घरात तिकीट न देता, हेमंत रासनेंना तिकीट दिलंय. तर चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार आहेत. इकडे महाविकास आघाडीत कसब्यातून काँग्रेस लढणार आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार असेल.
पुण्यातल्या कसबा पेठ मधून भाजपचे हेमंत रासनेंच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांनाच तिकीट मिळण्याची अधिक शक्यता आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांच्या विरोधात राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल. पण अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे, नाना काटे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत अपक्ष राहुल कलाटेंना राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलं होतं. त्यामुळं त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे.
जागा वाटपात मोठा ट्विस्ट भाजपनं कसब्यात केलाय. कसब्यातून दिवंगत मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी फडणवीसांकडे तिकीट मागितलं होतं.पण भाजपनं हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. यावरुन शैलेश टिळकांनी खंत व्यक्त केलीय. मात्र पक्षासोबतच राहणार असल्याचंही टिळकांनी स्पष्ट केलंय.
शैलेश टिळकांच्या नाराजीनंतर, भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजनांनी टिळकांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
हेमंत रासने पुण्यातून 4 वेळा नगरसेवक राहिलेत. पुणे महापालिकेचं स्थायी समितीचे अध्यक्षही होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. भाजपचे खासदार गिरीश बापटांचे निकटवर्तीय आहेत.
कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 28वर्षात 25वर्षे गिरीष बापट आमदार होते. त्यानंतर मुक्ता टिळक आमदार झाल्या.
कसबा मतदारसंघात प्रामुख्यानं येणाऱ्या भागांमध्ये शनिवार वाडा, सोमवार पेठचा काही भाग, नारायण पेठ, सदाशिव पेठ, दांडेकर पूल,मंडईची मुख्य बाजारपेठ, नवी पेठ आणि लोकमान्य नगरचा भाग येतो.
इथलं जातीय समीकरण पाहिलं तर मराठा आणि ओबीसी वर्ग 35 टक्के आहेत. ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के, मागासवर्गीय समाज 18 टक्के तर 10 टक्के मुस्लीम समाज आहे
चिंचवड मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर, इथं लक्ष्मण जगतापांचा दबदबा होता. 2004 मध्ये ते विधान परिषदेवर पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर चिंचवड मतदारसंघातून 2009 पासून लक्ष्मण जगताप आमदार होते…आता त्यांच्या पत्नी अश्विनी जगतापच भाजपच्या उमेदवार आहेत.
चिंचवड विधानसभेतलं जातीय समीकरण पाहिलं तर इथं मागासवर्गीय समाज 20टक्के, ब्राह्मण समाज 15टक्के, मराठा समाज 52टक्के, माळी समाज 7 टक्के, तर मुस्लिम मतं 5 टक्के आहेत
विशेष म्हणजे भाजपचे बिनविरोध करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत..स्वत: देवेंद्र फडणवीस काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलणार आहेत. पण भाजपची विनंती काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नाही. कारण याआधी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपनं आपला उमेदवार दिलाय. त्याची आठवणही काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते करुन देतायत.
पंढरपूर विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर भाजपनं पोटनिवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीनं भालकेंचे पुत्र भगिरथ भालकेंना तिकीट दिलं आणि त्याविरोधात भाजपनं समाधान आवताडेंना उमेदवारी देऊन त्यांना जिंकवून आणलं
देगलूरमध्ये काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतरही भाजपनं निवडणूक लढवली, त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले. तर शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या सुभाष साबणेंचा पराभव झाला.
कोल्हापूर उत्तर विधानसभेत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतरही भाजपनं पोटनिवडणूक लढवली. इथंही काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय झाला तर भाजपच्या सत्यजित कदम पराभूत झाले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसलाय. 3 ठिकाणी महाविकास आघाडी, एका ठिकाणी अपक्ष तर एकच जागा भाजपला मिळाली. आता महिन्याभरातच महाविकास आघाडीचं आव्हान भाजपसमोर असेल.