पुणे: कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काही उमेदवारांनी आपलं आव्हान उभं केलं आहे. हिंदू महासभेचे आनंद दवेही या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. संभाजी ब्रिगेडनेही या निवडणुकीत उमेदवार दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. कसब्यातून थेट कवी मनाचे नेते आणि बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेही मैदानात उतरले आहेत. मात्र, बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे बिचुकले यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा… अशा धमक्या आपल्याला येत असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केल्या आहे. फोनवरून या धमक्या आल्यानंतर बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रं लिहून त्याबाबतची तक्रार केली आहे. तसेच आपल्याला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही केली आहे.
अभिजीत बिचुकले हे कवी आहेत. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ते उभे असतात. मागच्यावेळी ते वरळीतून उभे होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. अभिजीत बिचुकले हे बिग बॉसमध्येही गेले होते. तिथूनच त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली होती. आव्हान देणं आणि वाद यामुळे बिचकुले नेहमीच चर्चेत असतात.
दरम्यान, कसबा पेठ विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात थेट सामना होणार आहे. धंगेकर यांच्यापाठी काँग्रेससह ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघीडीची शक्ती आहे. शिवाय धंगेकर यांची स्वत:चीही मते आहेत.
तर रासने यांच्या पाठी भाजपसह शिंदे गटाची ताकद आहे. मात्र, टिळक कुटुंबीय रासने यांच्या उमेदवारीवर नाराज आहे. भाजपचा एक गटही रासने यांच्या उमेदवारीवर नाराज आहे. त्यामुळे रासने यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.