पुणे : पुण्यात मुंबई-बंगळुरु बाह्य वळण महामार्गावर वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पुल, वडगाव पूल या महामार्गाभोवती अफाट नागरिकीकरण झाल्यानंतर मोठया प्रमाणात हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. 2014 पासून या ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत 56 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच शुक्रवारी (22 ऑक्टोबर) रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नऱ्हे गावच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटजवळ शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेंपो ट्राव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 12 जण जखमी झाले. यानंतर पुन्हा एकदा हा रस्ता चर्चेत आला आहे.
याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरीक करत आहेत. प्रशासन फक्त काम करत असल्याचे भासवत आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी फक्त पहाणी करुन आदेश देण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. परंतु त्यावरील ठोस उपयोजना झाली आहे की नाही, याकडे मात्र सर्रासपणे डोळेझाक करत असल्याचं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
● नेहमी अपघात होणारे अंतर चार किलोमीटर (कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल )
● छोटे-मोठे 42 अपघात
● 22 मृत्यू
● 7 ब्लॅक स्पॉट
● 40 हून अधिक जखमी
● 60 हून अधिक वाहनांचे नुकसान
● मोठे अपघात 16, मृत्यू 18
● 2014 पासून एकूण मृत्यू 56
कात्रज नवीन बोगद्यपासून नवले पुलापर्यंत अतिशय तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग वाढतो. वेग वाढल्यानंतर अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे अनेकदा नवले पुलाचा उतार आणि वडगाव पुलावर जाताना असणारा चढ तसेच विश्वास हॉटेल समोर असणारे पंचर अतिशय धोकादायक ठरत आहे. अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे दिसून आले आहेत. तसेच चालकांनीदेखील वाहने जबाबदारीने चालवावीत. महामार्गाच्या नियमांचे पालन करावे, असं महामार्ग प्रशासन आणि पोलिसांचं म्हणणं आहे.
याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला बेफाम वेगात वाहनं चालवणाऱ्या चालकांसह महामार्ग प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. अपघाताचं खापर वाहनचालकांच्या चुकांवर फोडण्याआधी प्रशासनाने आपल्या चुका दुरुस्त करण्याची अधिक आवश्यकता आहे.
हेही वाचा :
हुंड्याचे राहिलेले 1 लाख 60 हजारांसाठी सासरच्यांकडून जाच, तुळजापुरात विवाहितेची आत्महत्या
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा ! लग्नानंतर सलग 15 वर्षे छळलं, आठवेळा गर्भपात, आता थेट तिला विष पाजलं