Rupali Chakankar : खडकवासला विधानसभा मतदारसंघ विधवाप्रथा मुक्त होणार! रुपाली चाकणकरांच्या नेतृत्वात पुण्यात होणार ठराव

| Updated on: Jun 08, 2022 | 3:22 PM

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल 29 ग्रामपंचायतींनी व 4 प्रभागातील नागरिकांनी उद्या दि. 9 जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे.

Rupali Chakankar : खडकवासला विधानसभा मतदारसंघ विधवाप्रथा मुक्त होणार! रुपाली चाकणकरांच्या नेतृत्वात पुण्यात होणार ठराव
रुपाली चाकणकर (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघ विधवाप्रथा मुक्त करणार, असा निश्चय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला आहे. खडकवासला पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ठरणार, असा ठराव रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंजूर होणार आहे. पुण्यात एकाच दिवशी तब्बल 29 ग्रामपंचायती विधवा प्रथेविरुद्ध ठराव (Resolution against the practice of widowhood) करणार आहेत. आज एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येत आहे. पतीच्या निधनावेळी पतीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात (Society) पालन केले जाते.

ग्रामपंचायतींना केले होते आवाहन

महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल 29 ग्रामपंचायतींनी व 4 प्रभागातील नागरिकांनी उद्या दि. 9 जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे.

हे सुद्धा वाचा

घरातूनच सुरुवात

अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो 100 टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल. मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसूत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.