अंबाबाई मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट, अनेक गंभीर बाबी समोर!

| Updated on: Dec 17, 2020 | 4:44 PM

ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराच्या मूळ इमारतीवर 1 हजार टनाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. तो लवकरात लवकर उतरुन घेण्याची गरज बोलून दाखवली आहे.

अंबाबाई मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट, अनेक गंभीर बाबी समोर!
Follow us on

कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचं इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. यावेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय. देवस्थान समितीची पत्रकार परिषद आज पार पडली. या ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावर 5 ते 6 फुटाचा कोबा करण्यात आला आहे. मात्र मूळ मंदिराच्या बांधकामात तो दिसून येत नाही, असं महेश जाधव यांनी सांगितलं आहे. (Structural audit of Kolhapur Ambabai temple)

ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराच्या मूळ इमारतीवर 1 हजार टनाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. तो लवकरात लवकर उतरुन घेण्याची गरज बोलून दाखवली आहे. 50 ते 60 वर्षांपूर्वी मंदिरातील गळती रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने हा कोबा केला असावा असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ऑडिटमधून ही गंभीर बाब समोर आल्यानंतर हा कोबा काढून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

अंबाबाई मंदिर परिसरातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खननातही अनेक महत्वपूर्ण बाबी समोर येत असल्याचं महेश जाधव यांनी सांगितलं. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या सर्वच मंदिरं आणि जमिनीच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही जाधव यांनी दिली आहे.

अंबाबाई मंदिरात दर्शनाची वेळ वाढवली

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 11 डिसेंबरपासून दर्शनाची वेळ वाढवण्यात आली आहे. अंबाबाईच्या भक्तांसाठी ही मोठी बातमी आहे. मंदिरातील दर्शन वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत केली जाणार आहे. संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. दर्शनाची वेळ वाढवल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी कोरोनामुळे अंबाबाईचं दर्शन फक्त तीन तास सुरू होतं.

अंबाबाईचं मंदिर 17 नोव्हेंबरपासून भक्तांसाठी खुलं करण्यात आलं होतं. यासाठी सकाळी नऊ ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत रांगेतून दर्शन घेता येत होते. आता ती वेळ वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून आत जाण्याची आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाइन बुकिंगचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी-कुंकू, खण, नारळ, ओटी, फुल आदी देवीला वाहण्यावर बंदी आहे. त्यामुळे कुणीही या वस्तू आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनाची वेळ वाढवली, भाविकांना होणार लाभ

Structural audit of Ambabai temple