पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) खून प्रकरणी कोल्हापूरच्या संजय अरूण साडविलकर यांनी शनिवारी न्यायालयात साक्ष दिली आहे. वीरेंद्र तावडे याने पिस्तूल आणि गोळ्या बनवायला मला यांनी सांगितल्या. मात्र, मी त्या बनविल्या नाहीत, साक्ष देताना त्यांनी ही माहिती दिली. संजय साडविलकर कोल्हापूरमधील सराफा व्यावसायिक आहेत. मंगळवार पेठेतल्या हिंदू एकता कार्यालयात हिंदू संघटनांच्या बैठकांदरम्यान वीरेंद्र तावडे याच्याशी भेट झाल्याचे साडविलकर यांनी सांगितले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे (Sachin Andure), शरद कळसकर (Sharad kalaskar), अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
– सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013मध्ये पुण्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी अनेक वर्षापासून तपास सुरू आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी सापडलेला नाही. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दाभोलकर हत्येत वापरलेली एक पिस्तूल शोधून काढल्याचा दावा 5 मार्च 2020मध्ये केला होता. तर नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तुलांची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता.
– डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांची ओळख (19 मार्च 2022) पटली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दाभोलकरांच्या खुन्यांचे फोटो ओळखले. हत्येचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओखळले. अंदुरे आणि कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने सांगितले. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या, असेही तपासात समोर आले होते.
– डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि मी गोळीबार केला, अशी कबुली या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरने जून 2019मध्ये चौकशीदरम्यान दिली होती. त्याची न्यायवैद्यक चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीत त्याने हा खुलासा केला, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका अहवालाद्वारे विशेष न्यायालयात त्यावेळी दिली होती. मात्र न्यायवैद्यक चाचणीचे निकष किंवा रिपोर्ट हे कुठल्याही केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करता येतात आणि त्या आधारे आरोपीला शिक्षा होऊ शकते.