पुणे : कुत्र्यांच्या सान्निध्यात दोन वर्ष राहिलेल्या मुलाचा ताबा सध्या तरी जिल्हा बालकल्याणकडेच (Child welfare authorities) राहणार आहे. त्याच्या पालकांना नुकताच जामीन मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात आली आहे. कोंढवा येथील एका फ्लॅटमधून 22 कुत्र्यांसह एका अकरा वर्षीय मुलाची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या पालकांविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला होता. आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर (Bail) केला आहे. मात्र सध्या तरी मुलाचा ताबा पालकांकडे नसून पालकांची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुलाला त्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. बालकल्याण अधिकारी त्यांच्या राहणीमानाची पाहणी करतील. तोपर्यंत मुलगा बाल निवारागृहात (Children’s shelter home) राहील, असे सांगण्यात आले आहे. पालकांची प्रतिक्रिया अद्याप समजू शकलेली नाही.
तो त्याच्या समवयस्कांच्या सहवासात आनंदी आहे. त्याने वाढदिवसाच्या पार्टीतही आनंद लुटला आहे, ट्रेकला गेला आहे, त्याला खेळायला आवडते. आम्ही त्याला शाळेत दाखल करत आहोत, असे बाल कल्याण समितीच्या (CWC) बीना हिरेकर म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, की तपासणीनंतर बाल कल्याण अधिकारी हे तपासून पाहतील, की मुलाची काळजी घेण्याच्या सर्व अटी मुलाचा ताबा घेण्यापूर्वी पालकांनी पूर्ण केल्या आहेत की नाहीत. यामध्ये स्वच्छ वातावरण आणि तो शाळेत जातो याची खात्री करणे या गोष्टी समाविष्ट आहे. तसे नसेल तर तो बाल निवारागृहातच राहील. याठिकाणी त्याच्यासाठी चांगले वातावरण आहे. ज्ञानदेवी चाइल्डलाइन नावाच्या इमारतीतील मेडिकल दुकानाच्या मालकाने 4 मे रोजी या मुलाची सुटका केली आणि त्यानंतर त्याला दिघी येथील चाइल्ड केअर संस्थेत नेण्यात आले.
पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतात. तेथेच हा प्रकार घडला होता. 22 कुत्र्यांच्या सान्निध्यात मागील दोन वर्षांपासून मुलाला त्याच्या पालकांनी ठेवले होते. सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या ही बाब लक्षात अल्यानंतर त्यांनी चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल केला आणि याबाबतची माहिती दिली. आधी पालकांना समज देण्यात आली मात्र तरीदेखील त्यांच्यात बदल झाला नाही. शेवटी बालकल्याण समितीला याची माहिती देण्यात आली आणि मुलाची सुटका करून त्याच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय (Care and Protection of Children) कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्यांना आता जामीन मिळाला आहे.