रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

| Updated on: May 07, 2024 | 5:55 PM

Rupali Chakankar EVM Worship : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर हे प्रकरण शेकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा
ईव्हीएम मशीनची केली पूजा;
Follow us on

बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आला आहे. या मतदारसंघात आज सकाळपासून मोठं-मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांचा ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग गाजला. तर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. राजकीय वातावरण अशा प्रकारे ढवळून निघत असतानाच आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. कुठे घडला हा प्रकार, नेमकं घडलं तरी काय?

खडकवासाला परिसरातील घटना

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली. आता त्यांनी ईव्हीएम मातेकडे काय मागितले असेल हे वेगळं सांगायची गरज आहे का?

हे सुद्धा वाचा

निवडणूक अधिकारी चक्रावले

मतदानासाठी चाकणकर या ताट आणि दिवा कशाला घेऊन आल्या असतील असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता. मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले होते. पण चाकणकरांनी ईव्हीएमची पूजा करताच अधिकारी अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिकाऱ्यानेच याप्रकरणी तक्रार दिली. EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मीडियावर चर्चांना ऊत

या सर्व प्रकाराची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यात अजित दादांचा डायलॉग, सुप्रिया सुळे यांचे अजित दादांच्या घरी जाणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची ईव्हीएम पूजा यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर काहींनी या प्रकारावर नाक मुरडलं आहे.