Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच अजित पवार यांनी भाजपशी घरोबा केला. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर ते महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर आता भाजपच्या सांगण्यावरुनच सुनेत्रा पवार यांना बारामतीच्या लोकसभा रिंगणात उतरविण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. हा निर्णय भाजपच्या रणनीतीचा भाग असल्याची टीका करण्यात येते. त्यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत टीव्ही 9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
हा निर्णय कुणाचा?
हा धादांत खोटा प्रचार आहे. कुणी कुणाचं नाव सुचवलं नाही. जागा वाटप झाल्यावर कुणाला उमेदवारी द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीचाच होता. त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. कारण नसताना गैरसमज पसरविला जात आहे. बारामतीचा जो निर्णय आहे तोच आम्ही घेतला, असे अजित दादांनी स्पष्ट केले.
परभणीची जागा का दिली?
फक्त परभणीची जागा आम्हाला मिळाली होती. सोशल इंजिनियरिंगसाठी आम्ही ती जागा जानकर यांना दिली. तो निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला. तिथे आधी आम्ही राजेश विटेकरांना तयारीला लागायला सांगितलं होतं. नंतर आम्हाला दोन पावलं मागं घ्यावी लागली. जानकरांसाठी आम्ही आमच्या उमेदवाराला थांबवलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
40 वर्ष झाले सूनबाई घरातील होत नाही का?
शरद पवार यांच्या सुनेत्रा पवार यांच्या बाबतील टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिले. हा सवाल तुमच्या मनात येत नाही. एक त्रयस्थ नागरिक म्हणून त्यांच्या घरात एखादी ४० वर्षापूर्वी आलेली सून तुम्ही बाहेरची म्हणू शकता? आपल्यामध्ये सुनेला काय मान सन्मान आहे. हे माहीत आहे. हे पिढ्यान पिढ्या चालत आलं आहे. ही सूनच नंतर घराची लक्ष्मी होते आणि तिच्याच हातात घऱ जातं. तिच नंतर पुढच्या पिढीला जन्म देते, वाढवते. म्हणून मी सांगितलं. जे मनात आलं ते बोललो म्हणजे चुकलं का. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. चुकलं तर चूक कबूल करतो. अशाही घटना घडल्या. फार वर्षापूर्वी एक चुकीचा शब्द वापरला. त्यात राजकारण केलं. माझी बदनामी झाली. मी आत्मक्लेश केला. गावपातळीवरची सभा होती. पण त्याची किंमत आम्ही मोजली, असे अजितदादा म्हणाले.
अजित पवार भाजपच्या ट्रॅपमध्ये फसले?
कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. असलं लेचंपेचं काम माझ्याकडे नाही. राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं, सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे. त्यात तसूभर, नखाच्या एवढंही सत्य नाही, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.