पुणे | 24 जुलै 2023 : संघाचे ज्येष्ठ स्वयसेवक आणि सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुण्यात असणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि भाजपचे इतर मंत्रीही उद्या पुण्यात असणार आहेत.
मदनदास देवी यांचं पार्थिव उद्या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील संघाच्या मोतीबागमधील कार्यालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मदनदास देवी यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अमित शहा यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यासह केंद्रातील मंत्री उद्या पुण्यात उपस्थित असणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सह सरकार्यवाह, अभविपचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री मदनदास देवी यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय. ते 82 वर्षांचे होते.
मदनदास देवी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्याचं मुळगाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा.
मदनदास देवी यांनी यांनी सी. ए., एल एल. बी. पर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांनी संघासाठी झोकून दिलं. 1969 साली ते संघ प्रचारक झाले.
अभाविप मुंबई महानगरपासून ते अखिल भारतीय संघटन मंत्री असं त्यांनी काम केलं. सुमारे पस्तीस वर्षे त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं.
आणीबाणीच्या काळात भारत संरक्षण कायद्याखालील स्थानबद्धता त्यांना सोसावी लागली. विद्यार्थी परिषदेच्या जडणघडणीत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे यांच्यासह मदनदास यांचं लक्षणीय योगदान राहिलं.
एच.दत्तात्रय , सुशील मोदी, शिवराजसिंह चौहान, विनोद तावडे , चंद्रकांत पाटील, दिवंगत प्रमोद महाजन , अरुण जेटली , एच.एन. अनंतकुमार यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते मदनदास देवी यांच्या तालमीत घडले. मदनदास देवी यांच्या हाताखाली देशातील अनेक नेते घडले.
मागच्या काही वर्षांपासून मदनदास देवी यांना मेंदूची व्याधी जडली. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता पुण्या त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तिथे भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
देवी यांच्यावर उद्या पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित असणार आहेत.