पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवून साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सही असलेले नियुक्ती पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे. पुण्यात सध्या मोरे आणि बाबर असे मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. वसंत मोरेंची हकालपट्टी करत त्यांच्या जागी बाबर यांची वर्णी लावण्यात आली आहे. मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तर साईनाथ बाबरही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र बाबर यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. मनसेतील अंतर्गत धुसफुशीच्या चर्चांनंतर मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या पुण्यातील मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खांदेपालटाचा निर्णय घेण्यात आला.
– साईनाथ बाबर हे पुणे महापालिकेत मनसेचे नगरसेवक आहेत
– पुणे महापालिकेत मनसेचे गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे
– पुण्यातील कोंढवा खुर्द प्रभागातून साईनाथ बाबर नगरसेवकपदी निवडून आले आहेत
– वसंत मोरेंची हकालपट्टी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर प्रमुख पदी वर्णी
मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुण्यातील मनसेचे नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पुण्यातील मनसेचे नगरसवेक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र साईनाथ बाबर यांनी दुसऱ्याच दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’शी संपर्क साधला, आणि “राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. नाराज असण्याचा प्रश्न नाही, मी पक्षावर नाराज नाही” असं स्पष्टीकरण देत नाराजीच्या चर्चा खोडून काढल्या.
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत धूसफूस वाढल्यानंतर मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले होते. राज ठाकरे यांनी पुण्यातील नाराजीसंदर्भात पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचं दिसत आहे. वसंत मोरेंना या बैठकीबाबत कोणताही निरोप देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर वसंत मोरेंना शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं.
साईनाथ संभाजी बाबर
नगरसेवक, पुणे महापालिका
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी आपली नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी आणि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हीच अपेक्षा
आपली ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल
मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपणांस आपल्या पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो
आपला नम्र
राज ठाकरे
संबंधित बातम्या :
Vasant More | वसंत मोरेंना पुणे शहर प्रमुखपदावरुन हटवलं, राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं
मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय
NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…