पुणे: कोरोनाच्या संकटानंतर (corona) दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच इयत्ता दहावी आणि बारावीची ऑफलाईन परीक्षा (offline exams) होणार आहे. इयत्ता 10वीची परीक्षा यंदा 15 मार्चपासून ते इयत्ता 12वीची परीक्षा येत्या 4 मार्चपासून घेण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 दिवस उशिराने घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना (students) अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून बोर्डाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय दोन्ही परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा देण्याची वेळ येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 15 मिनिटे ते अर्धा तासाची वेळही वाढवून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी घेणार पत्रकार परिषद यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षांची घोषणा केली. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार नसून ऑफलाईनच होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. बारावीची परीक्षा दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी होते. यंदा ही परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तसेच इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत असते. मात्र, यंदा दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार असून 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा 15 दिवस उशिराने सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांनाही अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावर इयत्ता दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. 100 टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा होणार नाही. म्हणजे यंदा इयत्ता दहावी आणि बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, असं शरद गोसावी यांनी सांगितलं.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अधिकचा वेळ वाढवून दिला आहे. या दोन्ही परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच 70, 80 ते 100 गुणांसाठीच्या परीक्षेसाठी अर्धा तास देण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीचे सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी सकाळी 11 वाजता सुरू होतात. यंदा हे पेपर सकाळी 10 वाजून 30 मिनिटाने सुरू करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे दिली जातात. ही दहा मिनिटे यंदाही दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 10 वाजून 20 मिनिटाने सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात 2 वाजून 50 मिनिटाने प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वाढीव वेळेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष शाळेत हजर राहू न शकल्याने गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे ही वेळ वाढवून दिली आहे.
यंदा बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चवर असणार आहे. प्रॅक्टिकलच्या अभ्यासक्रमाच्या 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रॅक्टिकलची परीक्षा होणार आहे. तसे निकष तज्ज्ञांना विचारून करण्यात आल्याचं गोसावी यांनी सांगितलं. दहावीचे अंतर्गत मूल्यमापण किंवा प्रॅक्टिकल 40 टक्के अभ्यासक्रमावरच असेल.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 40 टक्के अभ्यासक्रम केला तरी अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ: परीक्षक त्याच शाळेतील ठेवण्यात येणार आहेत. सुपरवायझर आला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दडपण येऊ शकते. म्हणून बहिस्थ: परीक्षक नेमण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
HSC SSC Exam : ठरलं, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती
BMC BUDGET: मुंबई महापालिकेचा डिजीटल शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांना मसूरडाळ, हरभरे आणि तांदूळही देणार