महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण 65 टक्के मतदान झालं. अनेक उमेदवारांचं भवितव्य हे आता मतपेटीत कैद झालं. मात्र साऱ्या राज्यात एकाच विधानसभा मतदारसंघाची चर्चा रंगली आहे. राज्यातील एकाच मतदारसंघात नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल गांधी यांनी मतदान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नक्की हा प्रकार कोणत्या मतदारसंघात घडला? हे आपण जाणून घेऊयात.
पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल गांधी यांनी मतदान केलं. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. सत्ताधारी आणि विरोधककांकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी आणि व्होट कापण्यासाठी नामसार्धम्य असलेले उमेदवार उभे केले जातात. त्याच प्रकारे शनिवारी नामसार्धम्य असलेल्या या नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल गांधी यांनी मतदान केलं. काही वेळ या मतदारांच्या नावामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. देशातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि या मतदारांची नाव थोडीफार सारखीच असल्याने काही वेळ खळबळ उडाली. मात्र त्यानंतर नामसाधर्म्य असल्याचं स्पष्ट झालं.
कोथरुड मतदारसंघात नरेंद्र धीरजलाल मोदी, राहुल अनिल गांधी, शरद रामचंद्र पवार, अमित अशोक शहा, एकनाथ सोमनाथ शिंदे, अजित आत्माराम पवार, संजय एकनाथ राऊत, आदित्य प्रभाकर ठाकरे आणि रोहित राजेंद्र पवार हे मतदार आहेत.
दरम्यान कोथरुड मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत ही भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात आहे. भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, मनसेचे किशोर शिंदे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांच्यात ही मुख्य लढत आहे. तिन्ही पक्षांनी आपल्या या उमेदवारांसाठी जीव तोडून प्रचार केला. मात्र आता मतदार राजाने कुणाच्या बाजूने कौल दिलाय? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. पाटलांना 105246 इतकी मतं मिळाली होती. तर मनसेचे किशोर शिंदे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. किशोर शिंदेंना 79751 मतरादांनी पसंती दिली होती. आता चंद्रकांत पाटील आपली आमदारकी कायम राखण्यात यशस्वी ठरतात की कुणी नवा उमेदवार या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.