पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 1 आणि 2 ऑक्टोबर असा राज ठाकरेंचा दोन दिवसीय पुणे दौरा असेल. आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांचा हा आठवा पुणे दौरा असणार.
येत्या एक तारखेला मनसेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची पुण्यात बैठक होणार आहे. तर दोन तारखेला मनसेच्या शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला जाणार आहे. पुणे दौऱ्यात राज ठाकरे भाजप – मनसे युतीवर काय निर्णय घेणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘वेट अँड वॉच’ची भूमिका
दरम्यान, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत राज ठाकरे यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला होता. मात्र, राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना तूर्तास भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करु नका, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे-भाजप युतीचा मुद्दा तात्पुरता निकालात निघाल्याचे मानले जात आहे.
राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावरही घातली होती. परंतु, राज ठाकरे सध्या अत्यंत सावधपणाने पावले टाकताना दिसत आहेत.
पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला होता. चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी मान्य केलं मात्र, आगामी निवडणुकीबाबत युतीसाठी कसलाही प्रस्ताव दिला नसल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळे कार्यकर्त्यांच्या युतीबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यभरात भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना, पालघरमध्ये पोटनिवडणुकीसाठी युती झाली आहे.
45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा
गेल्या निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
भाजप – 99
राष्ट्रवादी – 42
काँग्रेस – 10
सेना – 10
मनसे – 2
एमआयएम – 1
एकूण जागा – 164
संबंधित बातम्या: