भाजपने खूप प्रयत्न करूनही, मोठा दारू गोळा पेरूनही लोकसभेला बारामतीचा किल्ला काही ढासळला नाही. भाजपसह अजित पवार गटाला या किल्ल्याला सुरूंग लावता आला नाही. लोकसभेचा हा कित्ता आता विधानसभेला गिरवल्या जाऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. ते सध्या या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्यांनी गावागावात जाऊन थेट मतदारांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. दादांचा रोखठोक स्वभाव माहिती असल्याने गावकरी पण बिनधास्त त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचत आहेत. अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.
दिवाळीत दादा पवार कुटुंबियांपासून अलिप्त
दिवाळीत बारामतीमध्ये पवार कुटुंबिय एकत्र येतात. अनेक वर्षांपासूनची ही पंरपरा आतापर्यंत खंडीत झाली नव्हती. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यावर सुद्धा कुटुंब एकत्र असल्याचा मॅसेज देण्यात पवार यशस्वी झाले होते. पण लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. त्याचवेळी लोकांच्या मनात पाल चुकचुकली. दिवाळीत अजित दादा पवार कुटुंबियांच्या आनंदात दिसले नाही. गोविंदबागेत झालेल्या दिवाळी पाडव्यात दादा न दिसल्याने राजकारण आता घरात सुद्धा शिरल्याची चर्चा रंगली आहे. पवार कुटुंबियांपासून दादा अलिप्त झाले का? अशी चर्चा आहे. आज भाऊबीज आहे. त्यात मला लाडक्या बहिणींनी सकाळी ओवाळले आहे. त्यामुळे मी भाऊबिजेला जाणार नाही, असे अजित पवार यांनी उत्तर देत वादावर पडदा टाकला. त्यामुळे विधानसभेत पवार विरुद्ध पवार अशी चुरस दिसणार हे नक्की आहे.
अजित दादांना मत देऊन बघा
“आमचं भविष्य ज्योतिषाकडे बघून जाऊन पाहू नका. तर अजित दादांना मत देऊन बघा. अजित दादांच्या भविष्यातील मतदार आम्ही रुईकर.” या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा आहे. रुई येथील गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांनी असे बॅनर झळकवल्याने दादांची कळी खुलली. अजित दादांनी स्वतः नागरिकांनी धरलेला बॅनर वाचून दाखविला.
दादा यांनी सध्या बारामती पिंजून काढण्याचा चंग बांधला आहे. ते मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकसभेला नाही दिली तर आता विधानसभेला संधी द्या, असे थेट आवाहन दादांनी बारामतीकरांना केलं आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांना नागरिकांनी बहुमताने विजयी केले होते. आता विधानसभेला अजितदादांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.